महाराष्ट्र संवाद न्यूज
मुंबई – भारतीय जनता पक्षाने पैसे देऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा खोटा जातीचा दाखला व्हायरल केला असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भारतीय जनता पक्षावर केला आहे. त्यांच्या या विधानानंतर आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा जातीचा दाखला समाज माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या जातीच्या प्रमाणपत्रात ओबीसी प्रमाणपत्र पवारांनी घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानंतर हा दाखला खोटा असल्याचं समोर आलं.
यावर अनेक प्रतिक्रिया समोर आल्या. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही यावर स्पष्टीकरण दिलं. हा जातीचा दाखल खोटा असल्याचं त्या म्हणाल्या. आता रोहित पवारांनीही हा जातीचा दाखल खोटा असून भाजपने हेतूपुरस्सर व्हायरल केल्याचं म्हटलं आहे.
या जातीच्या दाखल्याबाबत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना विचारलं असता त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. भाजपने पैसे देऊन खोटा जातीचा दाखला व्हायरल केला.
भाजप सत्तेसाठी लढत आहे आणि आम्ही सत्यासाठी लढतो. सत्य आम्हाला माहित आहे. असत्याची बाजू घेऊन भाजपला कोणत्याही परिस्थितीत सत्तेत यायचं आहे. त्यामध्ये सामान्य लोकांचं नुकसान झालं तरी त्यांना फरक पडत नाही, त्यामुळे भाजपचे नेते जसा विचार करतात तसाच विचार त्यांचे कार्यकर्ते करतात आणि त्यामुळेच शरद पवार यांचा जातीचा खोटा दाखला तयार करून व्हायरल करण्यात आला, असं रोहित पवार म्हणाले.
रोहित पवार नेमकं काय म्हणाले…
भाजपची ती प्रथा आहे. भाजपला सत्य कधी समजत नाही. त्यांना खोट्याच गोष्टी कळत असतात. त्यामुळे जो दाखल सोशल मीडियावर व्हायरल होत आहे तो खरा दाखला नाही. भाजपचे जे काही पैसे घेऊन काम करणारे सोशल मीडियाचे कार्यकर्ते आहेत, ज्यांना ट्रोल आर्मी म्हटलं जातं. त्यांनी हे काम केलं आहे. त्यांना प्रत्येक कॉमेंटला 3 रुपये आणि प्रत्येक लाईकला 10 पैसे अशा हिशोबाने जे काम करतात त्यांनी हे उद्योग केले आहेत.






