महाराष्ट्र संवाद न्यूज
राज्यात मोठ्या तोडफोडीनंतर शिंदे-फडणवीस-पवार सरकार सत्तेत आले असले तरी लोकसभा निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट), भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या वाट्याला जागा वाटपात किती जागा येणार यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत फॉर्मुलाच सांगितला.
लोकसभा निवडणुका नेमक्या कधी होणार याबाबत अद्यापही स्पष्टता नसली तरी देखील राज्यात लोकसभा निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडीमध्ये थेट सामना होण्याची चिन्हे आहेत. महायुती व महाविकास आघाडीमध्ये सामील असलेल्या घटक पक्षांच्या वाट्याला लोकसभेच्या किती जागा येणार? यावर नेहमी चर्चा सुरू असते. अशाच एका मुलाखतीमध्ये महायुतीच्या जागांबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे.
फडणवीस यांनी या मुलाखतीत भारतीय जनता पक्ष 26 तर शिंदे व अजित पवार गट 22 जागा लढविणार असल्याचे निश्चित झाल्याचे सांगितले आहे. एकट्या भाजपच्या वाट्याला 48 पैकी 26 जागा आल्या असून उर्वरित 22 जागांवर शिंदे व अजित पवार गटाचे उमेदवार निवडणूक लढतील. यात शिंदे व पवार गटाच्या वाट्याला नेमक्या प्रत्येकी किती जागा आल्या याबाबत त्यांनी भाष्य केलेले नाही. त्यामुळे हा मुद्दा देखील महायुती कळीचा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विद्यमान खासदारांना पुन्हा संधी देण्याची परंपरा असली तरी त्यांच्या एकूण कामाबाबत विचार करून त्यावर निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगत फडणवीस यांनी सत्ताधारी खासदारांची धाकधूक वाढविली आहे.
पाच राज्यातील निवडणुकांचा निकाल 3 डिसेंबरला समोर येणार आहे. या राज्यातील निकालानंतर लोकसभा निवडणुकीच्या चर्चा पुन्हा एकदा जोमात सुरू होतील.

