महाराष्ट्र संवाद न्यूज
शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राज्यात संघटनात्मक बांधणीसाठी भर दिला असून त्यासाठी विभागीय नेत्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये नगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्याकडे देण्यात आली आहे.
राऊत यांच्याकडे नगर, शिर्डीसह उत्तर महाराष्ट्र आणि पुणे जिल्ह्याची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यामुळे राऊत यांच्या नेतृत्वाखाली आता नव्याने संघटना बांधणीला वेग येण्याची चिन्हे आहे. या बांधणी दरम्यान काही पदाधिकारी देखील बदलले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 
नाशिक, दिंडोरी, जळगाव, रावेर, धुळे, नंदुरबार, अहमदनगर, शिर्डी, पुणे, बारामती, शिरूर, मावळ या लोकसभा मतदारसंघासह विधानसभा मतदारसंघ पिंपरी चिंचवड व मावळची जबाबदारी राऊत यांच्यावर सोपविण्यात आली आहे. दैनिक सामनातून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राऊत यांच्यासह शिवसेनेच्या अनंत गीते, चंद्रकांत खैरे, खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई, खासदार विनायक राऊत, खासदार राजन विचारे, आमदार भास्कर जाधव, आमदार रवींद्र वायकर आणि आमदार सुनील प्रभू या १० नेत्यांवर राज्यातील विभागवार संघटनात्मक, तसेच आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने विशेष जबाबदारी सोपविली आहे.
शिवसेना पक्षप्रमुखांनी ‘नेते’ मंडळात वाढ करून नेत्यांची संख्या वाढविली व आता नेत्यांवर विभागवार बांधणीची जबाबदारी टाकून निवडणुकांच्या तयारीसाठी पुढचे पाऊल टाकले.
अनंत गीते यांच्याकडे कोकण (रायगड) विभाग सोपविण्यात आला असून यामध्ये रायगड मावळ या दोन लोकसभा मतदारसंघासह पनवेल कर्जत आणि उरण या तीन विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे.
चंद्रकांत खैरे यांच्याकडे मराठवाडा विभागाची जबाबदारी सोपविण्यात आले असून यामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि जालना या मतदारसंघांचा समावेश आहे.
अरविंद सावंत यांच्याकडे पश्चिम विदर्भाची जबाबदारी देण्यात आली असून यामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ-वाशिम, वर्धा या मतदारसंघांचा समावेश आहे.
अनिल देसाई यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी देण्यात आली असून यामध्ये सातारा, माढा, सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी या मतदारसंघांचा समावेश आहे.
सुनील प्रभू यांच्याकडे सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड या लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली.
रवींद्र वायकर यांच्याकडे नांदेड, हिंगोली, परभणी या लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली.
राजन विचारे यांच्याकडे ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर हे लोकसभा मतदारसंघ सोपविण्यात आले आहे.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या लोकसभा मतदार संघाचे जबाबदारी विनायक राऊत यांच्याकडे तर नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली-चिमूर या मतदारसंघाची जबाबदारी भास्कर जाधव यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
जानेवारीत राज्यव्यापी शिबिर…
आगामी निवडणुकांची तयारी व महाराष्ट्रासह दिल्लीत ‘बदल’ घडविण्याची तयारी म्हणून जानेवारीत राज्यव्यापी शिबिर, जाहीर सभा व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या झंझावाती दौऱ्यांचे नियोजनही करण्यात आले असून, त्याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच होईल.

