महाराष्ट्र संवाद न्यूज
नवी दिल्ली -हिवाळी अधिवेशनादरम्यान लोकसभा आणि राज्यसभेत सुरक्षेच्या मुद्द्यावरून गोंधळ घातल्याच्या कारणावरून तब्बल 78 खासदारांचे निलंबन करण्यात आले. यात लोकसभेतील 33 तर राज्यसभेतील 45 खासदारांचा समावेश आहे.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज (18 डिसेंबर) 11 वा दिवस आहे. लोकसभेत सलग चौथ्या दिवशी सुरक्षेच्या मुद्द्यावरून गदारोळ झाला. सभापती ओम बिर्ला यांनी गोंधळ घालणाऱ्या 33 खासदारांना निलंबित केले. यामध्ये नेते अधीर रंजन चौधरी, काँग्रेसचे 11 खासदार, तृणमूल काँग्रेसचे 9, द्रमुकचे 9 आणि इतर पक्षांच्या 4 खासदारांचा समावेश आहे.
यानंतर राज्यसभेतही गदारोळ झाला. त्यामुळे सभापती जगदीप धनखड यांनी 45 विरोधी खासदारांना संपूर्ण अधिवेशनासाठी (22 डिसेंबरपर्यंत) निलंबित केले. यापूर्वी 14 डिसेंबर रोजी लोकसभेतून 13 खासदारांना निलंबित करण्यात आले होते. यामध्ये काँग्रेसचे 9, माकपचे 2, द्रमुक आणि सीपीआयच्या प्रत्येकी एक खासदारांचा समावेश होता.

आत्तापर्यंत एकूण 46 लोकसभा खासदारांना संपूर्ण हिवाळी अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे. सभागृहाचे कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. नंतर ते दुपारी 2 वाजेपर्यंत आणि नंतर उद्यापर्यंत तहकूब करण्यात आले. खासदारांच्या निलंबनानंतर सभागृह उद्यापर्यंत (मंगळवार) तहकूब करण्यात आले.

