महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या शिवसेना (ऊबाठा) प्रवेशानंतर शिर्डीतील शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असतानाच घाईघाईत पक्षाकडून संघटनात्मक फेरबदल करण्यात आले. फेरबदलामध्ये निष्ठावंतांना डावलण्यात आल्याने शिवसेनेला ‘विखेसेना’ होण्यापासून वाचविण्यासाठी निष्ठावंत शिवसैनिकांनी एल्गार दिला आहे. या पार्श्वभूमीवर शिर्डी लोकसभा मतदार संघातील निष्ठावंतांची संगमनेरमध्ये आढावा बैठक होत आहे. या बैठकीनंतर अनेकांची पक्षीय भूमिका ठरण्याची चिन्हे आहेत.
वर्षाअखेरीस रविवारी ३१ डिसेंबरला सकाळी ११ वाजता संगमनेरमध्ये ही बैठक होत आहे. माजी खासदार वाकचौरे यांचा पक्षप्रवेश, कोणताही पक्षीय विचार न करता केलेला संघटनात्मक फेरबदल, निवडीमध्ये निष्ठावंतांना डावलत खास व्यक्तिगत संबंध असणाऱ्यांना दिलेली पक्ष संघटनेतील पदे यामुळे अकोले, संगमनेर, श्रीरामपूर, कोपरगाव, राहाता (शिर्डी) येथील निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या पार्श्वभूमीवर संगमनेरमध्ये होत असलेल्या मेळाव्याला पक्षीय वर्तुळात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शिवसेनेला विखे सेना होण्यापासून वाचविण्यासाठी प्रामाणिक पक्षनिष्ठ शिवसैनिकांना एकत्रित आणण्यासाठी शिवसेनेतील नाराज गट सरसावला आहे. पक्षात गद्दारी झाली काहींनी मिंधे गटात जाण्याची धडपड केली तर काहींनी गद्दार खासदार लोखंडे यांचे विमानतळावर स्वागत केले. त्यांना नवीन यादीत स्थान मिळाले आणि निष्ठावंत बाजूला करण्यात आले. संपर्कप्रमुखांसमोर खोटे चित्र सादर करण्यात येत असून सर्वांचा विचार करून पक्ष टिकवण्याचे काम सर्व शिवसैनिकांनी एकत्रपणे करावे यासाठी ही आढावा बैठक आयोजित होत आहे.
त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि संपर्क नेते खासदार संजय राऊत यांच्या व्यक्तिगत भेटी घेत झालेल्या अन्यायासंदर्भात शिवसैनिक आपल्या व्यथा मांडणार आहे. यानंतरही पक्ष संघटनेत अपेक्षित बदल न झाल्यास दूर करण्यात आलेले पदाधिकारी आणि निष्ठावंत शिवसैनिक वेगळी भूमिका घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

