शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत ऑपरेशन करून दिल्याच्या मोबदल्यात सात हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी नाशिकच्या पिंपळगाव बसवंत येथील धन्वंतरी हॉस्पिटलचे दोन संचालक डॉक्टर लाच लुचपतच्या जाळ्यात अडकले आहे. डॉ. महेश प्रल्हाद परदेशी व डॉ. महेश रामविलास बुब अशी धन्वंतरी हॉस्पिटलच्या दोघा संचालक डॉक्टरांची नावे असून या दोन्ही डॅाक्टरांविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी (ता. २३ फेब्रुवारी) करण्यात आलेल्या या कारवाईबाबत माहिती अशी की, लाच लुचपत विभागाकडे तक्रार करणाऱ्या तक्रारदाराच्या आईचा हात फ्रॅक्चर झाला असल्याने रुग्णाला धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रुग्णालय प्रशासनाने शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत त्यांच्या हाताचे ऑपरेशन करण्यात आले.

शासकीय योजनेमध्ये मोफत ऑपरेशन करून दिल्याच्या मोबदल्यात आरोपी डॉ. महेश प्रल्हाद परदेशी (वय- ४० वर्षे, मेडिकल डायरेक्टर धन्वंतरी हॉस्पिटल, पिंपळगाव ता. निफाड जि. नाशिक) याने तक्रारदाराशी संभाषणादरम्यान सात हजार रुपये लाचेची मागणी केली. यासाठी दुसरा आरोपी डॉ. महेश रामविलास बुब (वय ५१ वर्ष, मेडिकल डायरेक्टर धन्वंतरी हॉस्पिटल, पिंपळगाव ता. निफाड जि. नाशिक) याने डॉ. परदेशी याला लाचेची मागणी करण्यासाठी प्रोत्साहन दिले. तक्रारदाराने यासंदर्भात नाशिकच्या लाच लूचपत विभागाशी संपर्क करत आपली तक्रार नोंदविली. लाच लूचपतच्या सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक मीरा आदमाने व सह सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांच्या नेतृत्वाखालील पोलीस हवालदार पंकज पळशीकर, पोलीस नाईक प्रमोद चव्हाणके, चालक पोलीस नाईक परशुराम जाधव यांच्या पथकाने लावलेल्या सापळ्यात डॉ. महेश प्रल्हाद परदेशी याने सदर लाचेची रक्कम पंचसाक्षीदार यांच्या समक्ष स्वीकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले.दोन्ही डॉक्टर आरोपींविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन १९८८ चे कलम ७ व कलम १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

