दि. ८ मार्च, मुंबई
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. जागा वाटपावरून महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीमध्ये चर्चा सुरू आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीत असून हे दोन्ही नेते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत. या चर्चेत एकनाथ शिंदे आणि अजित पवार लोकसभेच्या सर्वाधिक जागा मिळवण्यात यश मिळवतात का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर दुसरीकडे पक्षांतर्गत सर्व्हेनंतर भाजपकडून तब्बल डझनभर खासदारांची तिकिटे कापले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या संदर्भात टीव्ही नाईन मराठीने दिलेल्या वृत्तानुसार, भाजप महाराष्ट्रात ३६ पेक्षा जास्त जागांवर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे शिंदे गट आणि ठाकरे गटाची धाकधूक वाढल्याची चर्चा आहे. असं असताना आता भाजपच्या विद्यमान खासदारांचीदेखील धाकधूक वाढवणारी बातमी समोर आली आहे.
भाजपच्या नेतृत्वाकडून राज्यातील खासदारांचे अंतर्गत तीन सर्व्हे करण्यात आले. या सर्व्हेतून डझनभर खासदारांचा स्ट्राईक रेट समाधानकारक नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. स्ट्राईक रेट चांगला नसलेल्या खासदारांचं तिकीट कापलं जाऊ शकतं का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या डझनभर विद्यमान खासदारांची तिकिटं कापलं जाण्याची शक्यता आहे. सामाजिक समीकरणांसह स्थानिक पातळीवरील राजकारणदेखील या सर्व्हेत पाहण्यात आलं. काही विद्यमान खासदारांबाबत लोकांमध्ये असलेली नाराजी या सर्व्हेमधून समोर आली आहे. निवडून येण्याची हमी असलेल्या मजबूत उमेदवारांची आवश्यकता असल्याचं आता समोर येत आहे. तीनपेक्षा अधिक वेळा निवडून आल्याने काहींच्या तिकीटाबाबत आक्षेप घेण्यात आलाय.
या १२ जागांवर उमेदवार बदलण्याची शक्यता?
डॉ. सुजय विखे पाटील, अहमदनगर
प्रीतम मुंडे, बीड
सुभाष भामरे, धुळे
सिद्धेश्वर स्वामी, सोलापूर
संजयकाका पाटील, सांगली
सुधाकर श्रृंगारे, लातूर
उन्मेश पाटील, जळगाव
गोपाळ शेट्टी, उत्तर मुंबई
पुनम महाजन, उत्तर मध्य मुंबई
प्रताप चिखलीकर, नांदेड
रामदास तडस, वर्धा
रक्षा खडसे, रावेर

