दि. १६ मार्च संगमनेर
विनापरवाना बेकायदेशीररित्या गावठी कट्टा आणि काडतुसे कब्जात बाळगणाऱ्या संशयित आरोपीला घारगाव पोलिसांनी अटक केली आहे. अशोक दगडू खेमनर (वय २५ वर्ष, रा. हिरेवाडी, साकुर, ता. संगमनेर) असे पोलिसांनी अटक केलेले आरोपीचे नाव आहे.
खेमनर हा आपल्या कब्जात विनापरवाना गावठी कट्टा बाळगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. घारगाव पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाने मांडवे बुद्रुक गावच्या शिवारात असलेल्या अनिल शांताराम कढणे यांच्या शेतातील विहिरीजवळ असलेल्या कोपीमध्ये छापा टाकला. यावेळी पोलिसांना संशयित आरोपी अशोक दगडू खेमनर याने विनापरवाना स्वतःच्या कब्ज्यात गावठी कट्टा आणि पाच जिवंत काडतुसे बाळगले असल्याचे आढळून आले.
पोलिसांनी खेमनर याला अटक केली असून त्याच्या विरोधात घारगाव पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल सुभाष बोडखे यांच्या फिर्यादीवरून आरोपी खेमनर यांच्या विरोधात भारतीय हत्यार कलम कायदा ३/२५, ५, ७ सह जिल्हाधिकारी यांच्याकडील आदेश मुंबई पोलीस कायदा कलम ३७ (१)(३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


