गुरुवार दि. २८ मार्च, मुंबई
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आपल्या आठ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. आठ जागांपैकी रामटेकचा अपवाद वगळता उर्वरित सातही ठिकाणी विद्यमान खासदारांना संधी देण्यात आली असून शिर्डी लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे शिर्डीत आता ठाकरेंच्या शिवसेनेचे वाकचौरे व शिंदे यांच्या शिवसेनेचे लोखंडे यांच्यात लढत स्पष्ट झाली आहे.

शिर्डीत आजी-माजी खासदारांमध्ये लढत होणार असली तरी मोठ्या प्रमाणात या मतदारसंघात बंडखोरी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाल्याने या मतदारसंघातून इच्छुक असलेल्या केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची संधी हुकली आहे. त्यांचे समर्थक व काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या उत्कर्षा रूपवते यांच्या भूमिकेकडे आता लक्ष लागले आहे.
आजी-माजी खासदारांच्या सरळ लढतीमध्ये वंचितसह आणखी काही उमेदवारांचा समावेश असल्याने तसेच आजी-माजी खासदारांवर गद्दारीचा शिक्का बसलेला असल्याने यांच्या लढतीचा फायदा दोघात तिसरा घेऊ शकतो, असे प्राथमिक चित्र असल्याने या स्पर्धेत तिसरा उमेदवार कोण राहतो याची उत्सुकता वाढली आहे.
शिंदेंच्या शिवसेनेच्या पहिल्या यादीत लक्ष लागून असलेल्या नाशिक, ठाणे, कल्याणच्या जागांवरील उमेदवार अद्याप जाहीर झाले नाही.
पहिल्या यादीतील उमेदवार पुढील प्रमाणे…
मावळ – श्रीरंग बारणे, हिंगोली – हेमंत पाटील, हातकणंगले – धैर्यशील माने, कोल्हापूर – संजय मंडलिक, बुलढाणा – प्रताप जाधव, शिर्डी – सदाशिव लोखंडे, दक्षिण मध्य मुंबई – राहुल शेवाळे या विद्यमान खासदारांसह रामटेकमधून राजू पारवे यांना संधी देण्यात आली आहे.

