शनिवार दिनांक ६ एप्रिल
शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी करण्यासाठी मी इच्छुक होतो. मात्र माझ्या उमेदवारीला राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत विरोध केल्याचा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनच्या मटा कॅफे कार्यक्रमात हा गौप्यस्फोट केला.
शिर्डीच्या जागे संदर्भात आठवले म्हणाले, मी शिर्डीतून लढण्यास तयार होतो. निवडणूक पूर्व सर्वेक्षणाचा दाखला देत भाजपने शिवसेनेच्या (शिंदे गट) अनेक नेत्यांच्या उमेदवारीला मोठा विरोध केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतून कोणाला उमेदवारी द्यावी, याच्या सूचना भाजप नेतृत्वाने त्यांना केल्या. निवडणूक जिंकू शकणाऱ्या उमेदवारालाच उमेदवारी हा प्रमुख निकष यासाठी ठेवण्यात आला.
हेच लक्षात घेऊन रामदास आठवले प्रबळ उमेदवार नसल्याचे कारण पुढे करून विखे पाटील यांनी आठवले यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध करून त्यांना जागा देऊ नये, अशी भूमिका फडणवीस यांच्याकडे मांडली.
माझ्या शांत स्वभावाचा फायदा विरोधी पक्षातील नेते घेत असतात. महायुती आणि महाविकास आघाडीत जागा वाटपावरून वाद बघायला मिळाले. मलाही वाद घालता आला असता मात्र मी जुळवून घेत वाद घातला नाही, असे देखील ते म्हणाले.


