रविवार दि. ७ एप्रिल
पोलीस आणि संबंधितांशी असलेल्या मधुर संबंधामुळे संगमनेरात अवैध धंदे आता चोरून लपून नव्हे तर थेट उघड्यावर मोकळ्या मैदानात चालू असल्याचे समोर आले आहे. गावठी दारू बनविणाऱ्या हातभट्टीवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात नेहमीप्रमाणे कारवाईदरम्यान महिला आरोपी पसार झाली आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी, संगमनेर तालुक्यातील राजापूर येथे हनुमान नगर परिसरात असलेल्या एका मोकळ्या मैदानात सुरू असलेल्या गावठी दारूच्या हातभट्टीवर पोलिसांनी शनिवारी संध्याकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी ३८ हजार रुपयांच्या मुद्देमालासह गावठी दारू बनविण्याचे साहित्य आणि रसायन जप्त केले. कारवाईदरम्यान पोलीस पथकाने ही गावठी दारू बनविण्याचे हातभट्टी उध्वस्त करून टाकली. ही कारवाई सुरू असताना गावठी दारूची हातभट्टी चालविणारी महिला अलका काशिनाथ जाधव पसार झाली.
शहर पोलिसांनी केलेल्या या कारवाईत ताब्यात घेतलेल्या मुद्देमालात ३२ हजार ५०० रुपये किंमतीचे २० लिटर क्षमतेच्या प्लास्टिकच्या ३० बाटल्या, २५ लिटर क्षमतेचे लोखंडी पत्र्याचे दोन ड्रम, ५ हजार रुपये किंमतीचे २५ लिटरच्या प्लास्टिकच्या बाटल्यामध्ये ५० लिटर गावठी दारू आणि ५०० रुपये किंमतीचे रसायन तयार करण्यासाठी वापरले जाणारे दोन टिपाड असा ३८ हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला.
या प्रकरणी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात महिला पोलीस कॉन्स्टेबल सोमेश्वरी शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फरार झालेल्या अलका काशिनाथ जाधव (रा. हनुमान नगर,राजापूर) या महिलेविरोधात दारूबंदी कायदा कलम ६५ (E)(F)(D) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.


