रविवार दि. ७ एप्रिल
वडापाव खाण्याच्या बहाण्याने पत्नीने घरी बोलाविलेल्या एकोणवीस वर्षीय तरुणीवर पत्नीच्या मदतीने पतीने बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे.
पुण्यातील कात्रज येथे ३ मार्च रोजी ही घटना घडली असल्याची माहिती समोर येत आहे. यासंदर्भात पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून पुण्याच्या भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात शनिवारी पती-पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ओळखीच्या पीडित तरुणीला वडापाव खाण्यासाठी घरी येण्याचा आग्रह करत आरोपी महिलेने आपल्या घरी बोलावलं होतं. आग्रहाने बोलविल्याने पीडित तरुणी या महिलेच्या घरी गेली होती. थोडा वेळ गप्पाटप्पा झाल्यानंतर कामाच्या निमित्ताने आरोपी महिला घराबाहेर गेली. घराबाहेर जाण्याच्या बहाण्याने तिने घराची कडी बाहेरून लावून घेतली होती.
पत्नी घराबाहेर गेल्याची संधी साधत पतीने घरात एकट्या असलेल्या तरुणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तरुणीने त्याला विरोध करत घराबाहेर जाण्याचा प्रयत्न केला असता घराचा दरवाजा बाहेरून बंद असल्याने तिला घराबाहेर पडता आले नाही. आरोपीने तरुणीला धमकावत तिच्यावर बलात्कार केला.
या प्रकारानंतर पिढीत तरुणीने भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात धाव घेतली आरोपी पती-पत्नी विरोधात तक्रार दाखल केली. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून पती-पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.


