मंगळवार दि. ९ एप्रिल
मंगळवारी शिवालयात झालेल्या महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत जागा वाटपाची अधिकृत घोषणा करण्यात आली. महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत ठाकरे गट २१ लोकसभा मतदार संघात निवडणूक लढवणार आहे. तर काँग्रेस पक्ष १७ लोकसभा मतदार संघात उमेदवार देणार आहे. शरदचंद्र पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष १० लोकसभा मतदार संघातील जागा लढणार असल्याची घोषणा या पत्रकार परिषदेत एकत्रितपणे करण्यात आली.
गेल्या काही दिवसांपासून सांगलीसह काही लोकसभा मतदारसंघातील सुरू असलेला वाद संपुष्टात आला आहे. सांगलीची जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनाच लढणार असल्याचे शिक्कामोर्तब झाले.
या पत्रकार परिषदेला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना खासदार संजय राऊत तसेच शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
महाविकास आघाडीतील जागांचा तिढा सुटला असला तरी सत्ताधारी महायुतीमध्ये अद्यापही काही जागांवरील मतभेद कायम असल्याचे दिसते.
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना या २१ जागांवर लढणार… जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, मावळ, धाराशिव, रत्नागिरी, बुलढाणा, हातकणंगले, संभाजीनगर, शिर्डी, सांगली, हिंगोली, यवतमाळ वाशिम, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण, मुंबई ईशान्य.



