
शनिवार, दि. १३ एप्रिल
अवैधरित्या वाळु वाहतुक करण्यासाठी, कारवाई न करण्यासाठी ३५ हजाराची लाच स्वीकारताना सिंदखेडराजाचे तहसीलदार सचिन शंकरलाल जैस्वाल, शिपाई पंजाब ताठे, चालक मंगेश कुलथे यांना ३५ हजारांची लाच स्वीकारताना शुक्रवारी पकडण्यात आले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी लाचखोर तहसीलदार जैस्वाल याच्या घराची झडती घेतली असता घरातील नोटांचे ढीग बघून अधिकारीही चक्रावले.
जैस्वालच्या बंगला आणि निवासस्थानामध्ये घेतलेल्या झडतीत तब्बल ४७ लाखांची रोकड सापडल्याचे खळबळजनक वृत्त आहे. ३५ हजाराची लाच घेताना तहसीलदाराला पकडल्यानंतर बुलढाणा लाच लुचपत विभागाच्या पथकाने वेगाने कारवाई करत जैस्वाल यांच्या सिंदखेडराजा स्थित शासकीय निवासस्थानाची झाडाझडती घेतली. तिथे नोटांचे ढीगच पथकाच्या हाती लागले. त्याठिकाणी तब्बल ३७ लाख ५२ हजार रुपयांची रक्कम आढळून आली. त्याचबरोबर त्याच मूळ गाव असलेल्या परभणी येथील घराचीदेखील परभणी एसीबीच्या पथकाने झडती घेतली असता तिथे देखील ९ लाख ४० हजाराची रक्कम आढळून आली. यामुळे पथकाच्या पुढील तपासात आणखी मोठे घबाड हाती लागण्याची शक्यता विभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी बोलून दाखविली.
पथकाच्या हाती लागलेली रक्कम जप्त करण्यात आली असून लाचखोर तहसीलदार जैस्वालच्या मालमत्तांचा शोध सुरू करण्यात आला आहे.

