शुक्रवार, दि. १९ एप्रिल
भारतीय जनता पक्षाचा २०१४ चाच जुमला आता २०२४ मध्ये मोदी गॅरंटी नावाने समोर आणला जात आहे. ज्यांनी दहा वर्षाचा कार्यकाळात केवळ खोटे बोलून जनतेला फसविले तेच मंडळी आता या निवडणुकीत मोदी गॅरंटीचा ढोल वाजवत आहे. मात्र महाराष्ट्रात केवळ महाविकास आघाडी सरकारच्या काळातील फक्त “ठाकरे गॅरंटी” चालते, असे प्रतिपादन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवा नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी केले.
शिर्डी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत दाखल करण्यात आला. यावेळी झालेल्या सभेवेळी महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी मंत्री शंकरराव गडाख, आमदार लहू कानडे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे आदीसह महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
ठाकरे म्हणाले, या देशात खरं बोलणाऱ्या विरुद्ध ईडी कारवाई केली जाते. दक्षिणेत भाजपाचा सुपडा साफ असून उत्तरेमध्ये भाजप हाफ आहे. विविध पक्ष फोडूनही त्यांना सत्ता मिळत नाही, त्यामुळे दडपशाहीचे राजकारण सुरू आहे. ज्यांच्यावर कोणताही डाग नाही अशी लोक भाजपाला जुमानत नाही त्यामुळे हेमंत सोरेन, अरविंद केजरीवाल आदींना कोणतेही कारण नसताना तुरुंगात टाकले जात आहे.
गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असताना दहा वर्षाच्या कार्यकाळात भाजपाने कोणतेही काम केले नाही उलट नोटबंदी फसली, काळा पैसा परत आणता आला नाही, आतंकवाद रोखता आला नाही, बेरोजगारी महागाईत मोठी वाढ झाली आहे. बुलेट महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे यांनी सत्तेवर येतात शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत विनाअट कर्जमाफी केली. कोरोना काळात मोठे काम केले. त्यामुळे या महाराष्ट्रात फक्त ठाकरे गॅरंटी चालते. मोदी गारंटीच्या कोणत्याही जुमल्याला बळी न पडता महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून देत स्वाभिमानी महाराष्ट्राचे अस्मिता जपण्याचे आवाहन ठाकरे यांनी केले.
थोरात म्हणाले, राज्यामध्ये महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण आहे. फोडाफोडी आणि पक्षांतराच्या राजकारणाला महाराष्ट्रातील जनता कधीही थारा देणार नाही. राज्यात मविआचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
गडाख म्हणाले, कोरोना संकटात उद्धव ठाकरे यांनी अत्यंत चांगले काम केले असून संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी उभा आहे. यावेळी माजी आमदार डॉ. तांबे, भाऊसाहेब वाकचौरे यांची भाषणे झाली.
भव्य रॅलीला तरुणाईचा उदंड प्रतिसाद…
महाविकास आघाडीच्या वतीने वाकचौरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आदित्य ठाकरे, शंकरराव गडाख, लहू कानडे, डॉ. सुधीर तांबे आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या वतीने रॅली काढण्यात आली होती. ढोल ताशांचा गजर आणि फटाक्याच्या आतिषबाजीत निघालेल्या या रॅलीत तरुणांचा मोठा उत्साह जाणवत असल्याने ही रॅली लक्षवेधी ठरली.


