सोमवार, दि.२२ एप्रिल
मला दहा लाख रुपये दे, नाहीतर मी तुला या बांधकाम साइटवरील एकही फ्लॅट विकू देणार नाही, तुझे ही साईट बंद करून टाकेल. असा बिल्डरला दम दिल्याने बांधकाम व्यावसायिकांमध्ये खळबळ माजली आहे. याप्रकरणी खंडणी मागणाऱ्या विरुद्ध नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक प्रमोद बाळकृष्ण गोरे (वय ५५ वर्ष, रा. प्रकाश नगर, शिखरेवाडी, नाशिक रोड, नासिक) यांनी यासंदर्भात नाशिक रोड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, रविवारी (दि.२१ एप्रिल) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास गोरे हे मालधक्का रोडवरील नुरी मज्जिद नाशिक रोड येथे सुरू असलेल्या इमारत बांधकामाच्या साइटवरील ऑफिसमध्ये बसलेले असताना त्यांच्या ओळखीच्या किशोर भारती याने ऑफिसमध्ये येत फ्लॅट विकायचे असतील तर मला दहा लाख रुपये द्यावे लागतील. नाहीतर या साइटवरील एकही फ्लॅट विकू देणार नाही, अशी धमकी दिली.
त्यानंतर संध्याकाळी पुन्हा भारती याने मालधक्का आमचा आहे, तुला दहा लाख रुपये द्यावे लागतील. तुला बघून घेईल असे म्हणत शिवीगाळ केली. त्यामुळे गोरे यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यात भारती याच्याविरुद्ध दिलेल्या फिर्यादीवरून खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अधिक तपास करीत आहेत.


