शनिवार, दि. ४ मे
भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत, गेल्या दहा वर्षात १७ लाख हिंदू कुटुंबीयांनी देश सोडत दुसऱ्या देशाचे नागरिकत्व घेतले आहे. ख्रिश्चन मुसलमानांपेक्षा जास्त अन्याय हिंदूंवर झाले. राज्यसभेत समोर आलेली ही माहिती छापण्याची गोदी मीडियाची हिम्मत नसल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
प्रकाश आंबेडकर शनिवारी श्रीरामपूरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर वंचितचे पदाधिकारी उपस्थित होते.
आंबेडकर म्हणाले, पंतप्रधानांचे कार्यालय हे मानवतेचे कार्यालय असायला हवं, मात्र ते मानवतेच न राहता वसुलीच कार्यालय झाल आहे. मोदींनी इन्कम टॅक्स, ईडी, जीएसटी च्या माध्यमातून वसुलीतंत्र अवलंबले. वसुलीसाठी पंतप्रधान कार्यालयाचा वापर झाला. या वसुलीच्या तगाद्यामुळे १७ लाख लोक देश सोडून गेले. राज्यसभेत ही माहिती समोर आली. सभागृहातील ही माहिती जशीच्या तशी माध्यमांनी छापायला हवी मात्र असं घडताना दिसत नाही कारण मोदींनी त्यांच्या देखील नाड्या आवळल्या आहेत.
जगभर बँन करण्यात आलेले रेमडीसीवर भारतात मात्र पंतप्रधानांनी बॅन केले नाही. त्याचा देशात सर्रासपणे वापर झाला. त्याचे दुष्परिणाम आज नागरिकांच्या आरोग्याच्या बाबतीत दिसत आहे. रेमडीसीवरचे दुष्परिणाम समोर येत असताना यावर काँग्रेसवाले बोलण्यास तयार नाही. त्यामुळे ते लोकांचे प्रश्न मांडणार नाही तर त्यांना मतदान कशाला करायचे असा प्रश्न करत आपले प्रश्न मांडून सरकारला धारेवर धरणाऱ्यांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले.
भारतीय जनता पक्षाला हा देश हिंदुराष्ट्र करायचा आहे, त्यामुळे या देशात कुरेशी, कसाब मुसलमानांवर अत्याचार सुरू आहे. ज्यांच्या चौकशी सुरू आहे अशा नेत्यांना राजकारणातून बाहेर काढले पाहिजे. स्वतःची संपत्ती वाचविण्यासाठी ते उद्या देशाला सुद्धा विकून टाकतील. या जिल्ह्यातील सत्ता कुटुंब आणि नातेवाईकांभोवती फिरत राहिल्याने नात्यागोत्याच्या राजकारणात कार्यकर्त्याला संधी मिळाली नाही. नगर जिल्ह्यातील साखर कारखाने जिल्ह्याच्या विकासातील अडसर झाले आहे. भाजपसह शिवसेना काँग्रेसवर त्यांनी यावेळी टीका केली.
जहागीरदारी संपविण्याची गरज…
माझ्या मर्जीतला उमेदवार असेल तर निवडून आणणार आणि नसेल तर पाडणार ही विखेंची जहागीरदारी संपविण्याची गरज आहे ही जहागीरदारी संपेपर्यंत येथील विकास होणार नाही असे देखील आंबेडकर यांनी म्हटले.


