रविवार, दि. ५ मे
प्रत्येकाच्या बँक खात्यावर पंधरा लाख, दरवर्षी दोन कोटी बेरोजगारांना नोकऱ्या, अच्छे दिन असे खोटी आश्वासने देत सत्तेवर आलेल्या भाजपने आश्वासने न पाळता देशात महागाई, बेरोजगारी, महिला असुरक्षिततेसह अनेक प्रश्न निर्माण केल्याचा आरोप करत देशात इंडिया आघाडीचे सरकार सत्तेत आल्यास गरीब कुटुंबातील महिलांना वार्षिक एक लाख रुपये देणार असल्याचे प्रतिपादन काँग्रेस नेत्या डॉ. जयश्री थोरात यांनी केले.
महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी थोरात तालुक्यात निमज, चिकणी, राजापूर, निमगाव भोजापूर, खांडगाव, रायते या गावांमध्ये वाड्या-वस्त्यांवर घोंगडी बैठका घेत प्रचार करत आहे.
गावोगावी झालेल्या बैठकांमध्ये त्या म्हणाल्या, सध्या देशभरात महागाईचा आगडोंब उसळला आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती साडेचारशे रुपयावरून बाराशे रुपयापर्यंत गेल्या. पेट्रोल डिझेलचे शंभरी पार केली. खतांच्या किमतीने उच्चांक गाठत शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणले. अच्छे दिन आनू म्हणणाऱ्या भाजपने सर्वत्र बुरे दिन आणले आहे. बेरोजगार तरुणांसाठी नोकऱ्या निर्माण न करता त्यांच्या हातातील मोबाईलमध्ये महागडा डाटा देत त्यांना मोबाईलमध्ये गुंतवून ठेवले आहे. मोबाईलच्या विश्वातून बाहेर पडणाऱ्या तरुणांना हाताला काम नसल्याने बेरोजगारी समजू लागली आहे.
विकास ऐवजी धार्मिक मुद्दे पुढे करून देशातील तरुणांची डोकी भडकावली जात आहे. मात्र देर आये दुरुस्त आये या उक्तीप्रमाणे आता तरुणाईला देखील समजू लागले असून तरुण पिढी भाजपाच्या विरोधात जात असल्याने देशात इंडिया आघाडीचे सरकार सत्तेत येईल. काँग्रेसने कायम सर्व समावेशक राजकारण केले असून सर्व जाती धर्मांना न्याय दिला आहे. काँग्रेसच्या न्याय जाहीरनाम्यातून गरीब कुटुंबातील महिलांना प्रतिवर्षी एक लाख रुपये मिळणार आहे. याचबरोबर सर्वांचे हक्क देखील अबाधित राहणार असून लोकशाही बळकट होण्यास मदत होईल. यासाठी महाविकास आघाडीला मतदान करण्याचे आवाहन जयश्री थोरात यांनी केले.


