महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मुंबई | विशेष प्रतिनिधी:
राज्यातील गुटखा, तंबाखू आणि निकोटीनयुक्त पानमसाल्याच्या अवैध छुप्या साम्राज्याला मुळासकट उखडून टाकण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने आतापर्यंतचे सर्वात मोठे आणि आक्रमक पाऊल उचलले आहे. राज्यातील गुटखा माफियांचे नेटवर्क पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यासाठी आता थेट ‘मकोका’ (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अंतर्गत कारवाई करण्याचे धाडसी आदेश एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जारी केले आहेत. तुकाराम मुंढे यांच्या २१ वर्षांच्या धडाकेबाज प्रशासकीय कारकिर्दीतील हा सर्वात मोठा आणि ऐतिहासिक निर्णय मानला जात असून, या एकाच निर्णयाने राज्यातील गुटखा माफियांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
आतापर्यंत गुटख्यावरील कारवायांमध्ये केवळ लहान-मोठे पानटपरी चालक किंवा किरकोळ विक्रेतेच पोलिसांच्या कचाट्यात सापडायचे आणि मुख्य सूत्रधार पडद्यामागून नामानिराळे राहायचे. मात्र, आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हे चित्र पूर्णपणे बदलून थेट मुख्य सूत्रधारांना रडारवर घेतले आहे. प्रतिबंधित अन्नपदार्थांचा व्यापार हा आता ‘संघटित गुन्हा’ मानला जाणार असल्याने उत्पादक, मुख्य पुरवठादार, वाहतूकदार, मोठे घाऊक विक्रेते आणि गोदाम चालक अशा संपूर्ण काळ्या साखळीलाच उद्ध्वस्त केले जाणार आहे.
मकोका लागल्यामुळे गुन्हेगारांना आता कायदेशीर पळवाटा शोधणे अशक्य होणार असून आरोपींना सहजासहजी जामीन मिळणार नाही. बनावट कागदपत्रे, बेनामी व्यवहार आणि गुप्त गोदामांच्या माध्यमातून चालणाऱ्या काळ्याबाजारावर विशेष पथकांद्वारे कडक पाळत ठेवली जाणार आहे. तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या १० वर्षांत २६० उत्पादक, २४८ पुरवठादार आणि १९० वाहतूकदारांसह एकूण ७०३ जणांवर आधीच मोठी कारवाई करण्यात आली आहे. आता या मोहिमेच्या अधिक प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलीस प्रशासन, एफडीए आणि सरकारी वकील यांच्यात थेट समन्वय ठेवला जाणार असून प्रत्येक जिल्ह्यात मकोका प्रकरणांची स्वतंत्र नोंद ठेवली जाईल. तरुण पिढीच्या आरोग्याशी खेळणाऱ्या गुटखा माफियांना राज्यात आता कोणतीही माफी नाही, असा थेट आणि आक्रमक इशारा या निर्णयाद्वारे देण्यात आला आहे.