सोमवार, दि. ६ मे
नाशिक लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी माघारी संदर्भात चांगलेच महानाट्य रंगले होते. शेवटच्या मिनिटाला अर्ज मागे घेण्यासाठी एका उमेदवाराची चांगलीच धावपळ उडाली होती. या दरम्यान बहुचर्चित ठरलेल्या शांतिगिरी महाराज यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे.
शांतिगिरी महाराजांनी शिवसेनेकडून भरलेला उमेदवारी अर्ज छाननी बाद झाल्यानंतर त्यांचा अपक्षाच्या रूपाने दुसरा अर्ज निवडणुकीत कायम होता. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी ते आपली उमेदवारी मागे घेतील असा अनेकांचा कयास होता. मात्र निवडणूक लढविण्याच्या निर्णयावर महाराज ठाम राहिले. यामुळे त्यांच्या उमेदवारीचा फटका महायुतीच्या उमेदवाराला बसणार असल्याचे बोलले जात आहे.
नासिक आणि दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा अखेरचा दिवस होता. नाशिक मतदारसंघातून भाजप नेते अनिल जाधव यांनी दाखल केलेला उमेदवारी अर्ज एक मिनिट बाकी असताना मागे घेतला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात पदाधिकाऱ्यांची धावपळ उडाल्याचे दिसून आले. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) पदाधिकारी असलेले निवृत्ती अरीगळे यांनी देखील उपमुख्यमंत्री अजित पवारांनी समजूत काढल्यानंतर आपली उमेदवारी मागे घेतली. तर ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या विजय करंजकर यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज मागे घेत भाजपाच्या उमेदवार भारती पवार यांना दिलासा दिला. तसेच माकपचे उमेदवार जीवा पांडू गावित यांनी देखील माघार घेतल्याने त्यांच्या माघारीचा फायदा शरद पवार गटाला होण्याची चिन्हे आहेत. गावित यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे.


