बुधवार, दि. ८ मे
बिअर शॉपीचा परवाना मंजूर करून देण्यासाठी वर्ग एक ते तीनच्या तिघा अधिकाऱ्यांनी दीड लाख रुपयांची मागणी केली. प्रत्यक्षात एक लाख रुपयांची लाख स्वीकारताना दोघा जणांना लाच लूचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांसह तिघांविरुद्ध मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय जयसिंगराव पाटील (वय ५४ वर्ष), दुय्यम निरीक्षक चेतन माधवराव खारोडे (वय ३४ वर्ष) आणि कार्यालय अधीक्षक अभय बबनराव खताळ वय ५३ वर्ष) अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघा लाचखोर अधिकाऱ्यांची नावे आहे.
चंद्रपूरमध्ये लाचखोरीचा हा प्रकार समोर आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील घुगुस येथील तक्रारदाराने या संदर्भात चंद्रपूरच्या लाच लुचपत विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारीच्या पडताळणीनंतर लाच लुचपत विभागाच्या पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.
तक्रारदाराचा घुगुस येथे बियर बार आहे. त्याने बिअर शॉपी चा नवीन परवाना काढावयाचा असल्याने नोव्हेंबर २०२३ मध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे अर्ज दाखल केला होता. मात्र चंद्रपूर कार्यालयाचे अधीक्षक आणि दुय्यम निरीक्षक त्याला आज या, उद्या या असे सांगून परवाना मंजुरीसाठी टाळाटाळ करत होते.
बिअर शॉपीचा परवाना मंजूर करण्यासाठी अधीक्षक संजय पाटील यांच्यासाठी व स्वतःसाठी दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे यांनी तक्रारदाराकडे एक लाख रुपये लाचेची मागणी केली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने या संदर्भात लाच लुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती.
पडताळणी नंतर दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे यांनी कार्यालय अधीक्षक अभय खताळ याच्यामार्फत एक लाख रुपयांची लाच स्वीकारली. तसेच दुय्यम निरीक्षक खारोडे यांच्या फोनवरून अधीक्षक संजय पाटील यांची पडताळणी केली असता त्यांनी लाचे संदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे आढळून आले.
तिन्ही अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून स्वतःच्या आर्थिक फायदा करता लाचखोरी केल्याचे समोर आल्याने या तिघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुय्यम निरीक्षक खारोडे आणि कार्यालय अधीक्षक पाटील या दोघांना पथकाने ताब्यात घेतले.


