गुरुवार, दि. १६ मे
बँक अपहार प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपी करून मालमत्ता जप्त करण्याची भीती दाखवत तक्रारदार आणि साक्षीदाराकडे तब्बल एक कोटी रुपयांची आर्थिक गुन्हे शाखेचा तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक, सहाय्यक फौजदाराने लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार बीडमधून समोर आला आहे.
पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे, सहाय्यक फौजदार रवीभूषण जाधवर आणि व्यापारी कुशाल प्रवीण जैन अशी कारवाई केलेल्या आरोपींची नावे आहेत.
बीड येथील जिजामाता मल्टीस्टेट प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी एका बिल्डरकडून पोलीस अधिकाऱ्याने एक कोटी रुपयांची लाच मागितली तडजोडीअंती ठरलेल्या लाचेचा पहिला हप्ता व्यापाऱ्याकडे देण्यास सांगितले. व्यापाऱ्याने लाचेची रक्कम स्वीकारताच त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहे. कुशाल प्रवीण जैन असे एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पकडलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. तर लाचेची मागणी करणारा आर्थिक गुन्हे शाखेचा पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे, लाचेची मागणी करण्यास प्रोत्साहन देणारा सहाय्यक फौजदार रवीभूषण जाधवर फरार झाले आहे.
बीड एसीबीकडे या संदर्भात संबंधित बिल्डर आणि साक्षीदाराने तक्रार दाखल केली होती. त्यानंतर एसीबीचे पोलीस उपाधीक्षक शंकर शिंदे, अविनाश गवळी, भरत गारदे, अमोल खरसाडे, अंबादास पुरी, हनुमान गोरे, सुरेश सांगळे, स्नेहलकुमार कोरडे, गणेश मेहेत्रे, निकाळजे व नेहरकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
बीडमधील जिजाऊ मल्टीस्टेटचा संस्थापक बबन शिंदे याने पांगरी रस्त्यावर शाळा बांधली होती. शाळेच्या बांधकामासाठी लागणारे साहित्य तक्रारदारांनी दिले होते. त्याचे पैसेही तक्रारदाराला शिंदे याने दिले होते. मात्र जिजाऊ मल्टीस्टेट संदर्भात ठेवीदारांनी गुन्हा दाखल केल्यानंतर या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झाला होता. त्यात बँक स्टेटमेंटच्या माध्यमातून तक्रारदाराकडे पैसे वर्ग झाल्याचे दिसत होते.
या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या पोलीस निरीक्षक खाडे यांनी तक्रारदार आणि साक्षीदारास बोलावून घेत तुम्हाला या गुन्ह्यात आरोपी करत नाही, त्या बदल्यात प्रत्येकी पन्नास लाख अशा एक कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यासाठी गेल्या चार महिन्यापासून खाडे तक्रारदारास त्रास देत होते.
त्यामुळे तक्रारदाराने सोमवारी (दि. १३ मे) या संदर्भात बीडच्या एसीबीकडे तक्रार केली होती. त्यानंतर बुधवारी (दि. १५ मे) खाडे यांना देण्यासाठी तक्रारदार पैसे घेऊन गेला असता खाडे यांनी आपण पुण्याला आलो असल्याचे व जैन या व्यापाऱ्याकडे पैसे देण्यास सांगितले. त्यानंतर पैसे घेताना जैन याला पकडण्यात आले. पोलीस निरीक्षक खाडे आणि सहाय्यक फौजदार जाधवर यांचा तपास सुरू केला असता रात्री उशिरापर्यंत ते आढळून आले नव्हते.


