रविवार, दि. १९ मे
बीडमधील जिजाऊ मल्टीस्टेट १०० कोटीच्या गैरव्यवहार प्रकरणात आरोपी करण्याची भीती दाखवून बिल्डरकडे १ कोटी रुपयांची लाच मागून त्यातील पाच लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारणाऱ्या व्यापाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडल्यानंतर आर्थिक गणेश शाखेचा पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक फौजदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आता त्या पाठोपाठ या दोघांनाही निलंबित करण्यात आलेले आहे.
बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे आणि सहाय्यक फौजदार रवीभूषण जाधवर अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची नावे आहेत. १ कोटीच्या लाचेचे प्रकरण समोर आल्यानंतर हे दोघेही अधिकारी फरार झाले आहेत. अद्यापही हे दोघे सापडू शकलेले नाही. या दोन्ही अधिकाऱ्यांच्या घर झडतीमध्ये लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांच्या हाती मोठे घबाड लागले होते.
काय आहे प्रकरण…
बीड शहरातील जिजाऊ मल्टीस्टेट सहकारी बँकेमध्ये गतवर्षी १०० कोटीचा घोटाळा झाला होता. याप्रकरणी प्रमुख बबन शिंदे तसेच अध्यक्ष अनिता शिंदे यांच्यासह चार जणांवर गुन्हे दाखल झाले होते. याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेच्या हरिभाऊ खाडे यांच्याकडे होता. याच प्रकरणांमध्ये आरोपी बबन शिंदे यांनी दोन व्यावसायिकांना बांधकामाचे साहित्य पुरवल्यापोटी ६० लाख रुपये दिले होते. त्यामुळे या दोन्ही व्यावसायिकांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू होती. याच गुन्ह्यामध्ये आरोपी करण्याची भीती दाखवून पीआय खाडे यांनी या दोघांकडे ५० लाख, अशी एकूण एक कोटी रुपयांची लाच मागितली होती. अखेर ३० लाखात तडजोड झाली होती. यातील पाच लाख रुपयांचा पहिला हप्ता घेत असतानाच खासगी व्यापारी कुशाल जैन याला पोलिसांनी पकडले होते. त्याने ही लाच आर्थिक गुन्हे शाखेचा पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे आणि लाचेची मागणी करणारा रवीभूषण जाधवर यांच्या सांगण्यावरून स्वीकारली होती याची कबुली दिलेली आहे.


