शनिवार, दि. २५ मे
नगर शहरात घडलेल्या चैन स्नॅचिंग प्रकरणाचा तपास करणाऱ्या गुन्हे शाखेच्या पथकाला चोरीचे सोने विक्री करण्यासाठी बडी मज्जित मुकुंद नगर परिसरात एक संशयित आल्याची माहिती मिळाली. पथकाने संशयिताला पकडण्यासाठी या परिसरात लावलेल्या सापळ्यामध्ये दोघेजण पावणे दोन लाखाच्या मुद्देमालासह अलगद अडकले. त्यांच्या चौकशीत त्यांनी नगरच्या सावेडी, तारकपूर परिसरात केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली.
सलीम ऊर्फ सलीमोद्दीन अजोलोद्दीन शेख (वय ५४) व जिशान सलीम ऊर्फ सलीमोद्दीन शेख वय २१, दोघे रा. नवीन विडी वसाहत, कुंभारी, जि. सोलापुर मुळ रा. कासीम बऱ्ही दर्गा, पढेगांव, जि. छत्रपती संभाजीनगर) असे पोलिसांनी पकडलेल्या दोन्ही संशयित आरोपींची नावे आहेत.
यातील सलीम ऊर्फ सलीमोद्दीन अजोलोद्दीन शेख हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुध्द अहमदनगर, बीड, छत्रपती संभाजीनगर व परभणी जिल्ह्यात जबरी चोरी व चोरीचे ९ गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशावरून गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी पकडण्याची कारवाई केली आहे. पकडलेल्या आरोपींना संबंधित पोलीस स्टेशनचा ताब्यात देण्यात आले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, पोलिस अंमलदार रवींद्र कर्डिले, अतुल लोटके, फुरखान शेख, देवेंद्र शेलार, संतोष खैरे, सागर ससाने, रोहित येमुल, विशाल तनपुरे किशोर शिरसाठ व अरुण मोरे यांचा पथकात समावेश होता.


