सोमवार, दि. २७ मे
संगमनेरमधील अवैध कत्तलखान्यावर पोलिसांच्या कारवाया सातत्याने सुरू आहे. रविवारी रात्री देखील पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात कत्तल केलेल्या गोवंश जनावरांचे ६०० किलो गोमांस आढळून आले आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली.
उपअधीक्षक वाघचौरे यांना शहरातील जुना जोर्वे रोड लगत असलेल्या मदिना नगर मध्ये एका पांढऱ्या रंगाच्या (MH17 BD4182) बोलेरोमध्ये गोवंश जनावरांचे कत्तल केलेले नेले जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी याची माहिती आपल्या पथकातील पोलीस कर्मचारी राहुल डोके व राहुल सारबंदे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रमेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुनील माळी यांच्यासह पोलीस पथकाला कारवाईचे आदेश दिले.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला असता एका पांढऱ्या रंगाच्या पीकअपमध्ये त्यांना गोवंश जनावरांचे कत्तल केलेले गोमांस आढळून आले. पथकाने तेथे असलेल्या तनवीर इकबाल शेख (वय ३४ वर्ष, रा. मदिना नगर, गल्ली क्रमांक ४ याला ताब्यात घेत अटक केली.
पोलिसांनी रविवारी रात्री सव्वादहा वाजता केलेल्या या कारवाईत कत्तल केलेल्या जनावरांचे १ लाख २० हजार रुपये किमतीचे सहाशे किलो गोमांस आणि तीन लाख रुपये किमतीचे बोलेरो पिकप असा चार लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला.
यासंदर्भात पोलीस कॉन्स्टेबल गणेश पांडुरंग थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तनवीर शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


