गुरुवार, दि. ३० मे
पुण्याचे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराजे देसाई यांनी अब्रू नुकसानीची नोटीस बजावली आहे.
कल्याणीनगर पोर्शे कार अपघातानंतर आक्रमक झालेल्या आमदार रवींद्र धंगेकर यांनी सर्वच विभागांची पोलखोल करण्यास सुरुवात केली आहे. पुण्यातले बेकायदेशीर आणि बार विरोधात कारवाईची मागणी करत या विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हप्त्याचे रेट कार्ड समोर आणि धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी आंदोलन केलं होतं.
राज्य शुल्क विभागाचे मंत्री शंभुराज देसाई यांचा फोटो असलेल्या एका खोक्यावर ५० खोके असं लिहिलं होतं. यासोबत ५०० रूपयांच्या बनावट नोटा घेऊन घोषणा दिल्या.
या दोन्ही नेत्यांनी पुण्यात केलेल्या या आंदोलनानंतर राज्य शुल्क विभागाचे मंत्री शंभुराज देसाई यांचा संताप अनावर झाला असून आमदार रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी उत्पादन शुल्क विभागावर केलेले आरोप खोटे असल्याचे म्हणत शंभूराज देसाई यांनी सुषमा अंधारे यांच्यासह रवींद्र धंगेकर यांना थेट अब्रुनुकसानीची नोटीस बजावली आहे.
दरम्यान, या नोटीसीनंतर रवींद्र धंगेकर यांनी देखील पलटवार केला आहे. ‘जर माझ्याविरोधात कोणी हक्कभंग आणला तर माझ्याकडे इतके पुरावे आहेत की मी त्यांचा कसा हक्कभंग करतो ते पाहा’, असे म्हणत त्यांनी इशारा दिला आहे.


