शुक्रवार, दि. ३१ मे
तक्रारदाराविरुद्ध असलेल्या तक्रार अर्जाची चौकशी करून कारवाई न करण्यासाठी लाचेची मागणी करणारा शेवगाव पोलीस ठाण्यातील पोलीस हेड कॉन्स्टेबल लाचेच्या सापळ्यात अडकला असून त्याच्याविरुद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमदनगर लाचलुचपत विभागाने ही कारवाई केली असून पांडुरंग बाबुराव वीर असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस हेड कॉन्स्टेबलचे नाव आहे. वीर याच्याविरुद्ध श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील व्यक्तीने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती.
तक्रारदाराविरुद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात असलेल्या तक्रार अर्जाची चौकशी करून कारवाई न करण्यासाठी शेवगाव पोलीस ठाण्यातील पोलीस हेड कॉन्स्टेबल वीर यांनी पाच ते दहा हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यामुळे तक्रारदाराने लाच लुचपतकडे ११ मार्चला तक्रार केली होती.
त्यामुळे लाच लुचपत विभागाचे पोलीस उपाधीक्षक प्रवीणचंद्र लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक शरद गोर्डे व सहाय्यक सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक छाया देवरे यांनी १२ मार्चला पंचा समक्ष तक्रारीचे पडताळणी केली असता वीर यांनी तक्रारदारावर कारवाई न करण्यासाठी इतर पोलिसाने पाच-दहा हजार रुपये घेतले असते, तुमच्या मनाने हिशोबा-हिशोबाने द्या, असे म्हणत तक्रारदाराकडून लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविली होती.
त्यामुळे शुक्रवारी (३१ मे) यासंदर्भात शेवगाव पोलीस ठाण्यात आरोपी लोकसेवक पांडुरंग वीर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


