शुक्रवार, दि. ३१ मे
गेल्या आठवड्यात २८ हजार रुपयांची लाच घेताना पकडलेल्या कार्यकारी अभियंत्याच्या नावावर असलेल्या बँकेच्या लॉकरमध्ये लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांना आज मोठे घबाड आढळून आले.
चिंचोटी तलावातील बुडीत क्षेत्रातील गाळ व माती शेतात टाकण्याकरिता परवानगी मिळण्यासाठी माजलगाव, परळी वैजनाथ येथील कार्यकारी अभियंत्याला सात शेतकऱ्यांनी विनंती अर्ज दिला होता. या शेतकऱ्यांना गाळ व माती त्यांच्या शेतात टाकण्यासाठी परवानगी देण्यासाठी प्रत्येकी पाच हजार रुपयांप्रमाणे पस्तीस हजार रुपयांची लाच घेताना गेल्या आठवड्यात तक्रारदाराकडून दि. २२ मे रोजी कार्यकारी अभियंता राजेश आनंदराव सलगरकर याला बीडच्या लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले होते. पोलीस निरीक्षक युनूस शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली होती.
त्यानंतर लाच लुचपतच्या अधिकाऱ्यांनी सलगरकरच्या अंबाजोगाई येथील घराची घरझडती घेतली असता अधिकाऱ्यांना मिरज येथील युनियन बँकेच्या लोकांची चावी आढळून आली होती. आवश्यक त्या प्रक्रिया पार पाडत न्यायालयाच्या आदेशाने आरोपी राजेश सलगरकर यांच्या युनियन बँकेतील लॉकरची अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता अधिकाऱ्यांना लॉकरमध्ये मोठे घबाड आढळून आले.
११ लाख ८९ हजार रुपयांच्या रोकड रकमेसह लॉकरमध्ये २ किलो १०५ ग्रॅम वजनाचे सोने आढळून आले. यात १११४ ग्रॅम वजनाची सात बिस्किटे व ९९१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आढळून आले. लाच लुचपतच्या अधिकाऱ्यांनी या कारवाईत १ कोटी ६१ लाख ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. हा सर्व मुद्देमाल जप्त करून परळी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
लाच लुचपतचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव, पोलीस उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुलाब बाचेवाड, भरत गारदे, अमोल खरसाडे, अंबादास पुरी यांच्या पथकाने बँक लॉकरची तपासणी केली.


