शुक्रवार, दि. ३१ मे
शिक्षक हे देशाचा कणा आहेत. ते राष्ट्र जडणघडण करण्यात मोलाचे योगदान देतात. मात्र विविध प्रश्नांच्या विळख्यात पिढी घडवणारे गुरुजन अडकून पडले असताना त्यांना योग्य तो न्याय मिळावा, यासाठी मला अनेकांनी मागणी केल्यानंतर विधानपरिषद लढवण्याचा मी निर्णय घेतला आहे. अनेक शिक्षक संघटना, पाच जिल्ह्यातील शिक्षक संस्थाचालक यांच्याशी संवाद साधल्यानंतर आपल्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचा विश्वास नाशिक शिक्षक मतदार संघातील अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी व्यक्त केला.
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सोबतीने गणेश कारखाना निवडणुकीच्या माध्यमातून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पॅनलचा पराभव करत राज्याला परिचित झालेल्या माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांचे नातू, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे पुत्र विवेक कोल्हे यांनी राजकीय पक्षीय जोडे बाजूला ठेवत नाशिक शिक्षक मतदार संघातून शुक्रवारी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या माजी सरचिटणीस श्रीमती निलीमाताई पवार, के. के. वाघ, शिक्षण संस्थेचे समीर वाघ, प्रा. श्री. साळुंके सर, राजेंद्र कोहकडे, प्रा.अजयकुमार ठाकूर, प्रा. रावसाहेब शेंडगे, सचिन देसले आदीसह शिक्षक व प्रतिनिधी उपस्थित होते.
डॉ. तांबे यांची साथ मिळेल … निवडणुकीत नाशिक पदवीधरचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांचे मार्गदर्शन आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता कोल्हे म्हणाले, नासिक, नगर, जळगाव, धुळे व नंदुरबार या पाच जिल्ह्यात संस्थाचालक, शिक्षक संघटना, शिक्षक यांच्या भेटी घेतल्या असता डॉ. तांबे यांचे मोठे काम असल्याचे जाणवले. डॉ. तांबे यांच्याकडून शिकण्यासारखे खूप काही आहे त्यांची साथ आपल्याला आगामी काळात मिळेल असा विश्वास व्यक्त केला.
प्रश्नांच्या गुंत्यात शिक्षकांना अडकून ठेऊ नये. शिक्षक पवित्र ज्ञानदानाचे काम करतात त्यांचे प्रश्न सुटण्यासाठी मला काम करण्याची ही संधी आहे असे मी मानतो. इतर देशांच्या तुलनेत भारताची क्षमता मोठी आहे मात्र शिक्षकांचे प्रश्न अनेक वर्ष सुटत नसतील तर त्यासाठी कुणीतरी पुढे होऊन लढणे गरजेचे आहे. आमच्या कुटुंबाचं वसा हा सेवा हाच धर्म आहे त्यानुसार आम्ही तीन पिढ्या कार्यरत आहोत. शिक्षकांचा सन्मान टिकावा आणि त्यांचे प्रश्न सुटावे यासाठी माझे काम असणार आहे. माझी उमेदवारी ही शिक्षकांच्या आशीर्वादाने आहे त्यानुसार मी पूर्ण ताकतीने सकारात्मक कामाच्या रूपाने ही निवडणूक जिंकणार आहे. – विवेक कोल्हे, उमेदवार, नाशिक शिक्षक मतदार संघ.


