शनिवार, दि. १ जून
धान्य दुकानचा परवाना रद्द न करण्यासाठी तहसीलदाराने धान्य दुकानदाराकडे चाळीस हजार रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. तहसीलदार साहेबांच्या सांगण्यावरून तडजोडी अंती वीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना कोतवाल रंगेहात पकडला गेला.
अभिजीत लक्ष्मण जगताप व मच्छिंद्र मारुती माने अशी लाचखोरांची नावे असून अभिजीत जगताप हा तहसीलदार तर मच्छिंद्र माने कोतवाल आहे. या दोघा विरोधात बीडच्या केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एसीबीच्या धाराशिव युनिटने ही कामगिरी केली आहे.
एसीबीकडे तक्रार करणाऱ्या तक्रारदाराचे रास्त भाव धान्य दुकान असून त्याच्या दुकानांमध्ये शासनाकडून मिळालेला धान्यसाठा आणि तक्रारदाराने ग्राहकांना केलेले धान्य वाटप यामध्ये तपासणी तफावत आढळून आली होती. त्यामुळे तक्रारदारावर कारवाई न करण्यासाठी तसेच त्याच्या रास्त भाव धान्य दुकानाचा परवाना रद्द न करण्याकरिता केजचे तहसीलदार अभिजीत लक्ष्मण जगताप यांनी तक्रारदाराकडे केज तहसील कार्यालयातील कोतवाल मच्छिंद्र मारुती माने याच्यामार्फत तक्रारदाराकडे चाळीस हजार रुपयांची लाच मागितली होती.
तसेच तडजोडी अंती वीस हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारण्याची तयारी माने याने दाखविली. तहसीलदारासाठी लाचेची रक्कम स्वीकारताना आरोपी कोतवाल मच्छिंद्र माने याला शुक्रवारी एसीबीने रंगेहात पकडले.
एसीबीचे छत्रपती संभाजी नगरचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे व अपर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव एसीबीचे पोलीस उप अधीक्षक सिद्धाराम म्हेत्रे यांनी कारवाई केली.


