शनिवार, दि. १ जून
नाशिक विभागाचे शिक्षक मतदार संघाचे ठाकरे गटाचे पुरस्कृत विद्यमान शिक्षक आमदार किशोर दराडे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत असून महायुतीतर्फे पाठिंबा मिळविण्याच्या प्रयत्न करीत असल्याचे समजते.
आमदार दराडे यांचा कार्यकाल पुढील महिन्यात संपत असून या जागेसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली आहे. भाजपाच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे सुपुत्र विवेक कोल्हे यांनी शुक्रवारी या मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी दाखल करत नवा ट्विस्ट आणला आहे. कोल्हे यांच्या उमेदवारीने या मतदारसंघातील राजकीय गणित बदलण्याची चिन्हे आहेत.
आमदार दराडे पुन्हा निवडणूक लढविण्यास इच्छुक असून ते ठाकरे गटाकडून निवडणूक लढवितात की मुख्यमंत्री शिंदे गटाकडून निवडणूक लढवत महायुतीचा पाठिंबा मिळविण्यात यशस्वी ठरतात हे लवकरच समोर येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून किशोर दराडे हे महायुतीच्या अनेक कार्यक्रमात दिसून आले आहेत. त्यामुळे ते शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
मात्र आतापर्यंत किशोर दराडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. आमदार किशोर दराडे हे २०१९ ला शिवसेना (उबाठा) गटाकडून शिक्षक आमदारपदी निवडुन आले होते. त्यावेळी शिवसेना एकसंघ होती तर भाजप शिवसेना युती होती. आता मात्र परिस्थिती वेगळी असल्याने त्यांनी शिंदे गटाचा मार्ग पकडला. त्यामुळे मागील काळात शिंदे गटाच्या अनेक कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली. त्यामुळे नाशिक विभागात चर्चाना उधाण आले होते.
अपक्ष उमेदवारी करणाऱ्या कोल्हे यांना माजी मंत्री बाळासाहेब थोरात व नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या माध्यमातून रसद मिळण्याची चिन्हे आहेत. या दोन्ही नेत्यांच्या माध्यमातून कोल्हे यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या ताब्यातून गणेश कारखान्याची सत्ता हस्तगत केली होती. महाविकास आघाडीचा उमेदवार अद्याप ठरला नसल्याने सुरुवातीपासूनच दराडे यांच्या समोरील आव्हानात वाढ झाली आहे.


