शनिवार, दि. १ जून
नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट समोर आला आहे. विद्यमान आमदार किशोर दराडे यांच्या ऐवजी आता ॲड. संदीप गुळवे ठाकरे गटाचे उमेदवार असतील.
काँग्रेसचे दिवंगत नेते गोपाळराव गुळवे यांचे चिरंजीव काँग्रेस नेते आणि मराठा विद्या प्रसारक संस्थेचे संचालक असलेल्या ॲड. संदीप गुळवे यांनी शनिवारी मुंबईत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, शिवसेना नेते दिवाकर रावते, सुभाष देसाई, खासदार अरविंद सावंत यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.
यावेळी शिवसेनेचे नाशिक जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी आमदार योगेश घोलप आदी उपस्थित होते.
त्यानंतर शिवसेनेने नाशिक मतदार संघातून विद्यमान आमदार किशोर दराडे यांचा पत्ता कट करत आपला उमेदवार जाहीर केला. गुळवे आता शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार असतील. किशोर दराडे हे या मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार होते. मात्र दराडे मुख्यमंत्री शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचे वृत्त असल्याने शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) त्यांची उमेदवारी कापली असल्याची माहिती समोर येते.
दरम्यान शिक्षक मतदार संघातून उमेदवारी दिल्याबद्दल गुळवे यांनी विश्वास सार्थ ठरवत ही जागा जिंकून दाखवेल असे म्हटले आहे.
कोण आहेत ॲड. संदीप गुळवे…
दिवंगत काँग्रेस नेते गोपाळराव गुळवे यांचे चिरंजीव असलेल्या ॲड. संदीप गुळवे यांचे शिक्षण बीएएलएलबी पर्यंत झाले असून ते २०१२ ते २०१७ या कार्यकाळात नाशिक जिल्हा परिषदेचे सदस्य होते. नासिक जिल्हा सहकारी बँकेचे संचालक, मराठा विद्या प्रसारक मंडळाचे संचालक आहे.


