सोमवार, दि. ३ जून
नाशिक विभागाच्या शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू डॉ. राजेंद्र एकनाथराव विखे पाटील यांनी सोमवारी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे या मतदारसंघात आता एकूण पाच उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत.
भाजप नेते विवेक कोल्हे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत या मतदारसंघात वेगळी लढत करण्याचे संकेत दिले. कोल्हे यांच्यासह आता भाजपाच्या महसूलमंत्र्यांच्या बंधूंनी अपक्ष दाखल केलेल्या उमेदवारीमुळे या मतदारसंघात भाजपच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. सोमवारी भाजपने नाशिक वगळता उर्वरित तीनही विधानपरिषद मतदारसंघाचे उमेदवार जाहीर केले असताना या मतदारसंघात आता महायुतीची भूमिका काय आहे हे स्पष्ट होईल. कोल्हे-विखे यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे भाजप समोर मोठा पेच निर्माण झाला असून ही लढत अत्यंत चुरशीची होणार आहे.
शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी विवेक कोल्हे यांनी अपक्ष दोन, डॉ. पानसरे छगन भिकाजी यांनी अर्ज दाखल केले होते. त्या फोटो पाठोपाठ आज डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी दोन अपक्ष, निशांत विश्वासराव रंधे यांनी दोन अपक्ष व एक भाजपकडून अर्ज दाखल केला. याशिवाय राजेंद्र दौलत निकम यांनी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे या मतदारसंघात निवडणूक लढविणाऱ्यांची संख्या आता पाच वर गेली आहे.
विवेक कोल्हे हे माजी खासदार शंकरराव कोल्हे यांचे नातू तर भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्या मागे मोठी राजकीय ताकद आहे. विवेक कोल्हे यांनी विखे यांच्या ताब्यात असलेला गणेश सहकारी साखर कारखाना एकतर्फी निवडणुकीत आपल्या हाती आणला. त्यामुळे विखे-कोल्हे यांच्यात राजकीय संघर्ष निर्माण झाला आहे.
तर राजकारणातील मातब्बर घराणं म्हणून विखे घराण्याची ओळख आहे. दिवंगत बाळासाहेब विखे पाटील खासदार होते. तर त्यांचे पुत्र राधाकृष्ण विखे पाटील हे सध्याच्या युती सरकारमध्ये महसूल मंत्री आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे पाटील २०१९ मध्ये नगर दक्षिणचे खासदार झाले, याही निवडणुकीत त्यांनी भाजपकडून निवडणूक लढवली असून त्याचा निकाल मंगळवारी स्पष्ट होणार आहे. तर राजकारणापासून दूर असलेले राजेंद्र विखे पाटील यांनी शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीतून राजकारणात पाऊल टाकले आहे.
विखे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी डॉ. प्रदीप पवार, डॉ. एस. आर. पाटील, राजेंद्र खटोड, ॲड. अनंत फडणीस, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मॅनेजमेंट कौन्सिल सदस्य सागर वैद्य, अशोक सावंत, शिवाजीराव जोंधळे, प्रदीप दिघे आदींसह शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


