
मंगळवार दिनांक 4 जून
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार) निलेश लंके यांनी भाजपचे विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा मोठ्या मताधिक्याने धक्कादायक पराभव केला आहे. विखे यांचा विजयाचा आत्मविश्वास या मतदारसंघात मतदारांनी धुडकावून लावला.
राज्यातील लक्षवेधी लढतीमध्ये अहमदनगर दक्षिणचा समावेश होता. महाविकास आघाडीने या मतदार संघात विखे यांचा पराभव करण्यासाठी आपली ताकद पणास लावली होती. भल्याभल्यांचे अंदाज या मतदारसंघात फोल ठरले.
निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीनुसार सायंकाळी 7:50 वाजेपर्यंत निलेश लंके आपले प्रतिस्पर्धी उमेदवार सुजय विखे यांच्यापेक्षा 22 हजार 245 मतांनी आघाडीवर होते. त्यामुळे लंके यांचा विजय अंतिम मानला जात आहे. ते 29 हजार 314 मतांनी विजयी झाल्याचे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे.
(हे वृत्त आम्ही अंतिम आकडेवारीपर्यंत अपडेट करत आहोत)



