बुधवार, दि. ५ जून २०२४
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाची मोठी पीछेहाट झाली आहे. महाविकास आघाडीने राज्यात भाजपाचा मोठा पराभव केल्याने या पराभवाची जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारली. ही जबाबदारी स्वीकारून त्यांनी आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची तयारी वरिष्ठांकडे दाखवली आहे.
लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. भारतीय जनता पक्षाला दिल्लीतील आपल्या एकहाती सत्तेसाठी महाराष्ट्रात मोठ्या विजयाची अपेक्षा होती. त्यामुळे महायुतीने राज्यात ४५ पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले होते. मात्र निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर महायुतीने निराशाजनक कामगिरी केल्याचे स्पष्ट झाले.
राज्यात सत्ताधारी महायुतीला अवघ्या १७ जागांवर समाधान मानावे लागले. तर विरोधी असलेल्या महाविकास आघाडीला राज्यात अपेक्षेपेक्षा मोठे यश मिळाले. तब्बल ३० जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आल्याने राज्यात सत्ताधारी महायुतीच्या वर्चस्वाला मोठा धक्का पोहोचला आहे.
महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपाने अत्यंत सुमार कामगिरी करताना अवघ्या नऊ जागा मिळविल्या आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत राज्य मंत्रिमंडळातून बाहेर पडत पक्षीय कामकाज करण्याची तयारी दाखविली आहे.



