बुधवार दिनांक ५ जून २०२४
लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर राज्यात सत्ताधारी महायुतीला मोठा झटका बसला असून निवडणुकीत महाविकास आघाडीचे वर्चस्व दिसले. यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली असून त्यांनी यासंदर्भात राजीनाम्याची तयारी दर्शविली आहे. सरकारमधून मला मोकळं करावं, अशी विनंती त्यांनी पक्षाच्या नेतृत्वाला केली आहे.
यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले, यश-अपयशाची आमची सामूहिक जबाबदारी आहे. निवडणुकांमध्ये हार-जीत होत असते. सध्याच्या निवडणुकांमधील मतांची टक्केवारी बघितली तर मविआला जास्त जागा मिळाल्या असल्या तरी मतांची टक्केवारी सारखी आहे. मुंबईमध्ये दोन लाख मतं आम्हाला जास्त मिळाली आहे.
आम्ही सर्वांनी मिळून काम केलं आहे. त्यामुळे जे काही यश-अपयश जे आहे, त्याची आमची सामूहिक जबाबदारी आहे. एक टीम म्हणून आम्ही काम केलं आहे. देवेंद्र फडणवीस आणि मी राज्यात देखील चांगलं काम केलं आहे. यापुढेही राज्यात आम्हाला राज्यासाठी एकत्रित काम करायचं आहे.
मला वाटतं की, निवडणुकीतील अपयशाची आमची सामूहिक जबाबदारी आहे. एका निवडणुकीने सर्व काही संपत नसतं. एका निवडणुकीने विजय-पराभव झाला म्हणून आम्ही खचून जाणारे नाही. त्यांनी काही भावना व्यक्त केल्या असतील, पण आम्ही एक टीम म्हणून यापुढे काम करत राहणार आहोत, असे एकनाथ शिंदे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्ट केले.


