गुरुवार, दिनांक ६ जून २०२४
डॉ. सुभाष भामरे चार हजार मतांनी निवडून आल्याची बातमी आल्याने आणि मतमोजणीच्या १९ फेऱ्या बाकी असताना निवडणूक निकाल कसा जाहीर होऊ शकतो, यामुळे आम्ही चार वाजण्याच्या सुमारास सर्वजण मतमोजणी केंद्रात पोहोचलो असताना तेथे प्रतिस्पर्धी उमेदवाराकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन जोडून देत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप नवनिर्वाचित खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी केला आहे.

भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांचा अगदी अटीतटीच्या लढतीत डॉ. बच्छाव यांनी पराभव केला. त्यानंतर डॉ. बच्छाव यांचा बुधवारी धुळ्याच्या काँग्रेस कार्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत मतमोजणी केंद्रात कशा घटना घडत गेल्या याचा घटनाक्रम विशद केला.
प्रतिस्पर्ध्यांकडून अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांना दूरध्वनी जोडून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न झाल्यावर आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना, लोकशाही मार्गाने निवडणूक प्रक्रिया राबवून निर्णय दिला पाहिजे, असे सांगितले.
दहशत आणि दबावाचे राजकारण मतमोजणी केंद्रात करण्यात आले. मतमोजणीत आपण ३८३१ मतांनी विजयी झाल्याचे स्पष्ट झाले असतानाही प्रतिस्पर्धी उमेदवाराकडून फेर मतमोजणीचा अर्ज देण्यात आला असल्याचे बच्छाव यांनी म्हटले.


