सोमवार, दिनांक ११ जून २०२४
मोबाईल दुकानात काम करणाऱ्या तरुणाने सहा-सात महिन्यांपूर्वी एका तरुणीशी झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत तिला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी संकेत सतीश अंकाराम (रा. दिल्लीगेट, तोफखाना, अहमदनगर) या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी समोर आलेली अधिक माहिती अशी, फिर्यादी तरुणी अहमदनगर शहरांमध्ये राहत असून तिच्या मित्राची सावेडीतील प्रोफेसर चौकात मोबाईल शॉपी आहे. तेथे संकेत अंकाराम हा कामास असून त्याची पाच-सहा महिन्यांपूर्वी या फिर्यादी तरुणीशी ओळख झाली होती. या ओळखीतून दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. त्यातून त्यांच्या गाठीभेटी होत असत.
२० नोव्हेंबर २०२३ रोजी संकेत याने फिर्यादी तरुणीला मोबाईलवर संपर्क केला असता ती घरी एकटी असल्याचे समजल्यावर या तरुणाने कामानिमित्त भेटायचे असल्याचे तिला सांगत तिच्या घरी गेला. तरुणी शिवाय घरात कोणी नसल्याचा गैरफायदा घेत त्याने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर आरोपी अंकाराम हा वारंवार तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत असे.
१५ मे २०२४ रोजी आरोपी संकेतने तरुणी सोबत शारीरिक संबंध ठेवल्या असता तिने त्याच्याकडे लग्नाबाबत विचारणा केली. त्यावर त्याने नंतर बघू असे म्हणत वेळ मारून नेली. वारंवार विचारणा करून देखील त्याने तरुणीसोबत लग्नास नकार दिल्याने तिने दिलेल्या फिर्यादीवरून संकेत अंकाराम याच्याविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तोफखाना पोलीस पुढील तपास करत आहे.


