मंगळवार, दि.११ जून
लोकसभा निवडणुकीत उमेदवारांच्या नाम साधर्म्यामुळे आणि चिन्हांच्या साधर्म्यामुळे पक्षीय उमेदवारांना मोठा फटका बसल्याचे समोर आले असताना आता नाशिक शिक्षक मतदार संघात नामसाधर्म्यामुळे गोंधळ उडण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे या मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी मोठा ट्विस्ट बघावयास मिळाला.
नाम साधर्म्य असलेल्या उमेदवाराच्या धोका टाळण्यासाठी प्रमुख उमेदवार प्रयत्नशील झाले आहेत. उमेदवारी अर्जाची छाननी झाल्यानंतर अर्ज मागे घेण्यासाठी केवळ दोन दिवसांचा वेळ असल्याने नाशिक शिक्षक मतदार संघात मोठ्या राजकीय घडामोडी बघावयास मिळत आहे. महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार किशोर दराडे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड. संदीप गुळवे यांच्या नावाशी नामसाधर्म्यामुळे असलेल्या दोन अपक्ष उमेदवारांनी मंगळवारी निवडणुकीतून माघार घेतली.
नाशिक शिक्षक मतदार संघात येत्या २६ जूनला मतदान होत आहे. महायुतीकडून शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार किशोर भिकाजी दराडे आणि महाविकास आघाडीकडून ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार संदीप गोपाळराव गुळवे यांचे उमेदवारी अर्ज कायम आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी बुधवारचा शेवटचा दिवस असल्याने या मतदारसंघात महाविकास आघाडीचे गुळवे, महायुतीचे दराडे आणि अपक्ष विवेक कोल्हे व डॉ. राजेंद्र विखे पाटील यांच्यात लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


