बुधवार, दिनांक १२ जून २०२४
दरोड्याच्या उद्देशाने दबा धरून बसलेली टोळी संगमनेर पोलिसांनी बुधवारी पहाटे पकडली. टोळीतील चौघेजण पोलिसांच्या हाती लागले तर दोघेजण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.
बबलू अनिल निकाळे (रा. आंबेडकर नगर, राहता) याच्यासह तिघा अल्पवयीन मुलांचा आरोपींमध्ये समावेश असून रितेश सदाफळ व बुट्ट्या सदाफळ (दोघे रा. गणेश नगर, राहता) अशी पसार झालेल्या दोघा आरोपींची नावे आहेत.
हे सर्व आरोपी बुधवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावरील अमरधाम जवळील एका चिंचेच्या झाडाच्या आडोशाला पोलिसांना संशयास्पदरित्या हालचाली करताना आढळून आले. पोलिसांना पाहताच आरोपींनी पळ काढला मात्र त्यापैकी चौघांना पकडण्यात पोलीस यशस्वी झाले. तर दोघे पसार झाले.
पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून टाटा माझा कंपनीची MH02 BZ5223 या क्रमांकाची तीन लाख रुपये किमतीची गाडी, त्यातील डिक्कीतून लोखंडी गज, एक कोयता आणि आरोपींकडून करवतीच्या पात्यासारखा टोकदार चाकू, लाकडी दांडक, लोखंडी पक्कड, दोन मोबाईल हस्तगत केले आहे.
आरोपीं विरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल हरिश्चंद्र बांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भादवि कलम ३९९, ४०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार पुढील तपास करत आहे.



