मुलींच्या शिक्षण व स्वावलंबनाच्या गप्पा मारल्या जात असतानाच संगमनेर तालुक्यातून एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलगी अल्पवयीन आहे हे स्पष्ट माहीत असूनही कायद्याची पायमल्ली करत तिचे लग्न लावून देणाऱ्या ५ जणांविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साकुर येथील राजा बिरोबा मंगल कार्यालयात २४ मार्च २०२६ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास हा बालविवाह पार पडला. मुलगी १८ वर्षांपेक्षा लहान असल्याची पूर्ण जाणीव असतानाही आरोपींनी लपून-छपून हा विवाह उरकला. या प्रकरणी बालविवाह प्रतिबंधक अधिकारी तथा ग्रामपंचायत अधिकारी सागर परसराम रसाळ (वय ३५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आहे.
या प्रकरणी वामन दगडू खेमनर, रत्ना वामन खेमनर, अरुण वामन खेमनर, गणेश मारुती बर्गे आणि मनीषा गणेश बर्गे यांच्यावर बालविवाह प्रतिबंधक अधिनियम, २००६ मधील कलम ९, १० आणि ११ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून, घारगाव पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.