कर्जत येथील सोनारगल्लीतील ‘ओम ज्वेलर्स’ हे दुकान फोडून चांदीचे दागिने लांबवणाऱ्या टोळीचा अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून मिरजगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेला आणखी एक गुन्हा उघडकीस आणण्यात यश आले आहे.
दिनांक ८ ते ९ सप्टेंबर २०२६ च्या दरम्यान कर्जत येथील सोनारगल्लीत राहणारे व्यापारी उमेश प्रदीप कुलथे (वय ४०) यांच्या ‘ओम ज्वेलर्स’ या दुकानाचे शटर तोडून अज्ञात चोरांनी चांदीचे दागिने चोरून नेले होते. या घटनेबाबत कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील चोरी व घरफोडीचे गुन्हे तातडीने उघडकीस आणण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिश भोये व त्यांच्या पथकाने गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला.
तपासादरम्यान, हा गुन्हा भगतसिंग सुरेशसिंग बावरे (रा. अमळनेर, ता. पाटोदा, जि. बीड) याने आपल्या साथीदारांसह केला असून, ते जामखेड-अहिल्यानगर रस्त्यावरील टाकळीफाटा येथे येणार असल्याची पक्की माहिती पथकाला मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी टाकळीफाटा येथे सापळा रचून भगतसिंग सुरेशसिंग बावरे (वय २५, रा. अमळनेर, जि. बीड) आणि लखनसिंग शेरसिंग टाक (वय २४, रा. वडवणी, जि. बीड) यांना ताब्यात घेतले. त्यांची सखोल चौकशी केली असता, त्यांनी गोविंदसिंग संपतसिंग बावरे, सनीसिंग जितेंद्रसिंग गोवे (दोघे रा. पाटोदा, जि. बीड) आणि अजयसिंग महेंद्रसिंग बावरे (रा. लातूर) या फरार साथीदारांच्या मदतीने ही चोरी केल्याची कबुली दिली.
तसेच चोरलेला मुद्देमाल त्यांनी दत्तात्रय मुरलीधर म्हस्के (वय ३८, रा. बाहेगव्हाण, ता. वडवणी, जि. बीड) याला विकल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी दत्तात्रय म्हस्के यालाही ताब्यात घेतले आहे.
अधिक चौकशीत आरोपींनी १० सप्टेंबर २०२६ रोजी मिरजगाव येथील चौकात एका सोनाराचे दुकान फोडण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले. मात्र, तेथे नागरिक जमा झाल्याने त्यांनी पळ काढला आणि पळून जाताना तिखी गावच्या शिवारातून एमएच-१६-बीपी-४६४२ क्रमांकाची दुचाकी चोरली होती. या माहितीवरून मिरजगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेला गुन्हाही उघडकीस आला आहे.