शुक्रवार, दिनांक १४ जून २०२४
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख निश्चित झाली असून गुरुवार पासून (२७ जून) अधिवेशनाला प्रारंभ होणार आहे. ते पुढील महिन्याच्या शुक्रवारपर्यंत (१२ जुलै) चालणार आहे.
तेरा दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प देखील लगेचच २८ जून रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे. शनिवार २९ जून २०२४ सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील विधिमंडळाचे कामकाज सुरू राहणार आहे.
शुक्रवारी विधान भवनात विधानपरिषद आणि विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली या बैठकीत अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीला विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे) यांच्यासह कामकाज सल्लागार समितीचे सदस्य, विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे आदी उपस्थित होते.



