सोमवार, १७ जून २०२४
विविध कारणावरून विवाहितेला शिवीगाळ करत शारीरिक मानसिक त्रास देऊन घराबाहेर काढण्याचा प्रकार कनकुरी (ता. राहाता) येथे घडला. या संदर्भात घुलेवाडी संगमनेर येथील विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून सासरच्या लोकांविरुद्ध संगमनेरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पती यशोदीप बाबासाहेब शेटे, सासरा बाबासाहेब बबनराव शेटे, सासू वृषाली बाबासाहेब शेटे व दीर श्रेयस बाबासाहेब शेटे (सर्व रा. कनकुरी ता. राहाता) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
विवाहिता कनकुरी येथे सासरी नांदत असताना आरोपींनी तिला तिच्या वडिलांनी लग्नात दोन लाख रुपये हुंडा दिला नाही, आमचा मानपान नीट केला नाही, तुला घरातील कामे नेट येत नाही या कारणावरून शिवीगाळ करत शारीरिक व मानसिक त्रास दिला.
तसेच मूलबाळ होत नाही म्हणून पतीने दुसरे लग्न करायचे असून स्टॅम्प पेपर वर संमती लिहून दे, असे म्हणून फिर्यादीस शिवीगाळ, लाथा बुक्क्याने मारहाण करत अंगावरील दागिने काढून घेत घराबाहेर हाकलून दिले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान दिलासा सेलमार्फत या प्रकरणात मध्यस्थीचा प्रयत्न झाला मात्र दोन्ही कुटुंबीयात सिमेंट घडून न आल्याने अखेर फिर्याद दाखल करून घेण्यात आली. पुढील तपास संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस नाईक सुजाता थोरात करत आहे.



