बुधवार, १९ जून
नगर जिल्ह्यात कॅफेंचे पेव फुटले आहे. या कॅफे हाऊसमध्ये जोडप्यांना अश्लील जाळे करण्यासाठी प्रायव्हसी मिळत असल्याने हे कॅफे अश्लील चाळ्यांच्या उद्योगाचे केंद्र बनले आहे. नगर पोलिसांनी उपनगरातील दोन केंद्रांवर छापे टाकत कॅफे चालकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहे.
नगर शहरातील सावेडी उपनगरात असलेल्या कॅफेमध्ये शाळा महाविद्यालय विद्यार्थ्यांना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिले जात असल्याची माहिती तोफखाना पोलिसांना मिळाली होती.
पोलिसांनी सोमवारी सावेडी उपनगरातील डौले रुग्णालयाजवळील स्टेला कॅफेवर टाकलेल्या छाप्यात कॅफेच्या नावाखाली प्लायवुडचे कम्पार्टमेंट करून, पडदे लावून अंधार करून मुला-मुलींना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याचे आढळून आले. तसेच तेथे अश्लील चाळे करताना काही मुला-मुलींना पकडण्यात आले. पकडलेल्या जोडप्यांना समज देऊन सोडून देण्यात आले. या कारवाईत कॅफेमालक अजिंक्य बाळासाहेब कोतकर (वय २०, रा. कोतकर मळा, केडगाव) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर याच अनुषंगाने मंगळवारी दुपारी पोलिसांनी दुसरी कारवाई केली. नगर-मनमाड रस्त्यावरील बॉलीवूड कॅफेंवर केलेल्या कारवाईत देखील असाच प्रकार आढळून आल्याने कॅफे मालक सुमित भाऊसाहेब ठोंबे (१८, रा. अरणगाव, नगर) याच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केल्याचे सांगितले जाते.


