रविवार, २३ जून
चोरीच्या गुन्ह्यात अटक असलेल्या आरोपीला ठसे घेण्यासाठी पोलिसांनी कोठडीतून (लॉकअप) बाहेर काढलेला आरोपी पोलिसांना चकवा देत पसार झाला. गजबजलेल्या परिसरात असलेल्या हडपसर (पुणे) पोलीस ठाण्यात ही घटना घडली. पोलिसांसह गुन्हे शाखेची यंत्रणा कामाला लागले आणि अवघ्या दीड तासातच आरोपीला दिवे घाटातून पकडण्यात पोलिसांना यश मिळाले.
गोविंद उर्फ पिंट्या घोडके पसार झालेल्या आणि गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाने नंतर पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. घोडके याला हडपसर पोलिसांनी एका चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती.
शनिवारी (२२ जून) दुपारी साडेबारा एकच्या दरम्यान त्याला पोलीस कोठडीतून हाताचे ठसे घेण्यासाठी बाहेर काढण्यात आले होते. त्यावेळी पोलिसांचे लक्ष नसल्याची संधी साधून चकवा देत तो तेथून पसार झाला. आरोपी पसार झाल्याचे दिसतात पोलिसांची एकच धावपळ उडाली होती.
त्यामुळे हडपसर पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकाने त्याचा शोध सुरू केला. पसार झालेल्या घोडकेच्या शोधासाठी नाकाबंदी करण्यात आली. यासह पोलिसांनी या भागातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यास सुरुवात केली. त्याला शोधण्यासाठी हडपसर पोलिसांसह गुन्हे शाखेची पथके रवाना करण्यात आली.
तब्बल दीड तासाच्या शोध मोहिमेनंतर पसार झालेला आरोपी गोविंद उर्फ पिंट्या घोडके याला गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाने दिवे घाटात ताब्यात घेत पुन्हा हडपसर पोलिसांच्या हवाली केले.
दरम्यान, आरोपी पळाल्याची माहिती समजताच पोलिस उपायुक्त आर. राजा यांनी घटनास्थळी भेट दिली. आरोपी कसा पसार झाला, याबाबत चौकशीचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत.


