महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- दिवाळीचे दिवस अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले असल्याने ठेकेदाराने विधी महाविद्यालय ते एकता चौक या रस्त्याच्या कामाला तातडीने सुरुवात करावी. विकासकामांसाठी निधी आपण उपलब्ध करून देतो, परंतु रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यास लोकप्रतिनिधींची बदनामी होते. त्यामुळे कामाचा दर्जा उत्तमच राहिला पाहिजे आणि त्यात कोणतीही तडजोड अजिबात खपवून घेतली जाणार नाही, अशी तंबी आमदार अमोल खताळ यांनी ठेकेदाराला दिली.
संगमनेर येथील विधी महाविद्यालय ते एकता चौक हा रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून अत्यंत खराब अवस्थेत होता. या रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणासाठी आमदार खताळ यांच्या विशेष पाठपुराव्यातून ४० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या महत्त्वपूर्ण कामाचा शुभारंभ आमदार खताळ आणि स्थानिक ग्रामस्थांच्या हस्ते झाला.
आमदार खताळ म्हणाले की, साडेतीन ते चार वर्षांपूर्वीच या रस्त्याचे काम करण्यात आले होते. मात्र, कामाचा दर्जा निकृष्ट असल्याने अल्पावधीतच रस्त्यावर मोठे खड्डे पडले. रस्त्याच्या दोषनिवारण कालावधीत संबंधित ठेकेदाराकडून वेळेत दुरुस्ती करून घेतली असती, तर नागरिकांना रोजचा मनस्ताप सहन करावा लागला नसता. या रस्त्यावरून शालेय बस, दूध उत्पादक शेतकरी, नागरिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे ही केवळ वाहतुकीची समस्या नसून थेट नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्न आहे. तात्पुरती डागडुजी करण्याऐवजी पारदर्शकता आणि गुणवत्ता राखून काम करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सोशल मीडियावर होणाऱ्या टीकेचा समाचार घेताना आमदार खताळ यांनी सांगितले की, दुष्काळी परिस्थिती आणि इतर गरजा लक्षात घेता विकासकामांसाठी निधी मिळवणे सोपे नसते. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करावा लागतो. कामाचे गांभीर्य न समजता समाजमाध्यमांवर चुकीच्या पोस्ट टाकणाऱ्यांनी प्रत्यक्षात निधी मिळवण्यासाठी लागणारे प्रयत्न समजून घेतले पाहिजेत.
हे काम केवळ या रस्त्यापुरते मर्यादित न राहता साई श्रद्धा चौकातून पुढे जाणारा रस्ता आणि समनापूरपर्यंतच्या रस्त्याचे टप्प्याटप्प्याने सिमेंट काँक्रिटीकरण केले जाईल. शहरालगतच्या भागात वाढती लोकवस्ती, शाळा-महाविद्यालये आणि व्यवसाय लक्षात घेता पुढील १० वर्षांचा विचार करूनच पायाभूत सुविधांचे नियोजन केले जात आहे. या कार्यक्रमाला शिवसेना-महायुतीचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. घुलेवाडीचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवणार- रस्त्यांसोबतच घुलेवाडी परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहरालगत असूनही पूर्वी योग्य नियोजन न झाल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या समस्येवर भाष्य करताना खताळ यांनी घुलेवाडीचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याचा निर्धार व्यक्त केला. केवळ पाइपलाइन टाकणे किंवा बिले काढण्यापुरते काम मर्यादित न ठेवता, पाणी साठवणुकीची व्यवस्था वेळेत पूर्ण करून ही योजना गतीने पूर्ण केली जाईल, असे त्यांनी सांगितले.