सोमवार, १ जुलै
विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आज पाच नावांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये भाजप नेत्या आणि लोकसभा निवडणुकीत बीड मतदार संघातून पराभूत झालेल्या पंकजा मुंडे यांच्या नावाचाही यात समावेश आहे.
विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून कोणाला संधी द्यावयाची याबाबत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बैठकांचे सत्र सुरू होते. यासाठी भारतीय जनता पक्षाकडून अनेक इच्छुकांची नावे देखील समोर आली होती. मात्र पक्षात वारंवार डावलले जात असल्याने नाराज असलेल्या तसेच लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा देखील यात समावेश होता. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांना विधान परिषदेत संधी द्यावी यासाठी आग्रही मागणी केली जात होती.
मात्र आज या संदर्भात भाजपने सर्वांची उत्सुकता संपवत पाच जणांची नाव जाहीर केली आहे. यात अपेक्षेप्रमाणे पंकजा मुंडे यांना संधी मिळाली असून त्यांच्यासह डॉ. परिणय फुके, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली आहे.
भारतीय जनता पक्षाकडून पाचही नावे जाहीर करण्यात आल्याने उर्वरित इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. यामुळे मुंडे पुन्हा राज्याचा सभागृहात दिसतील.


