मंगळवार, २ जुलै
नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे निवडून आल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केली.
किशोर दराडे यांनी अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे आणि महाविकास आघाडीचे ॲड. संदीप गुळवे व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार ॲड. महेंद्र भावसार यांचा पराभव केला. कोल्हे दुसऱ्या स्थानी राहिले.
दराडे (शिवसेना) यांना तिसऱ्या फेरी अखेर २६ हजार ४७६ मते मिळाली होती. जिंकून येण्यासाठी ३१ हजार ५७६ इतक्या मतांचा निश्चित केलेला कोटा १९ व्या फेरी अखेर उमेदवार किशोर दराडे यांनी पूर्ण करून सर्वाधिक पसंतीक्रमाची ५ हजार ६० मते मिळवून ३२ हजार ३०९ मत मिळवत विजय मिळविला.
निवडणुकीची मतमोजणी अंबड येथील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात शांततेत पार पडली. मतमोजणीसाठी एकूण ३० टेबल ठेवण्यात आले होते. या निवडणुकीत एकूण ६४ हजार ८५३ मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी ६३ हजार १५१ मते वैध ठरली तर १ हजार ७०२ मते अवैध ठरली.
जिंकून येण्यासाठी ३१ हजार ५७६ इतक्या मतांचा निश्चित कोटा ठेवण्यात आला होता. कोटा निश्चित झाल्यानंतर बाद फेऱ्यांचे मतमोजणी सुरू झाली. यामध्ये १९ व्या बाद फेरीनंतर संदीप गुळवे बाद झाले त्यानंतर अंतिम लढत किशोर दराडे व विवेक कोल्हे या दोन उमेदवारामध्ये झाली. यामध्ये जिंकून येण्यासाठी ३१ हजार ५७६ इतक्या मतांचा निश्चित केलेला कोटा १९ व्या फेरी अखेर उमेदवार किशोर दराडे यांनी पूर्ण करून सर्वाधिक पसंती क्रमाची ५ हजार ६० मते मिळवत विजय नोंदविला. विवेक कोल्हे याना तिसऱ्या फेरी अखेर १७ हजार ३९३ मते पडली असून सर्वाधिक पसंती क्रमाची ६ हजार ७२ मते पडली.
आयोगाच्या परवानगीने डॉ. गेडाम यांनी किशोर दराडे यांना विजयी उमेदवार म्हणून घोषित केले. यावेळी निवडणूक निरीक्षक डॉ. विक्रम कुमार, नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा, अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, धुळ्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मनीषा खत्री, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर आयुक्त निलेश सागर, डॉ. शशिकांत मंगरूळे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


