रविवार, ०७ जुलै
१६ वर्षांपूर्वी सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या एका खटल्यातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नव्या पक्षाची स्थापना केली. २००७ साली स्थापन केलेल्या मनसे पक्षाच्या सुरुवातीच्या काळातच राज यांनी मराठीच्या मुद्द्यावरुन सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे आंदोलन केले होते.
२००८ साली रेल्वे भरतीमध्ये मराठी मुलांना प्राधान्य देण्याच्या मुद्द्यावरुन मनसेनं रान उठवलं होतं. मध्य रेल्वेने विविध पदांसाठी भरती सुरु केली होती. त्यात मराठी मुलांना संधी द्यावी यासाठी मनसेने महाराष्ट्रभर आंदोलन सुरू केले होते.
या आंदोलनाला शिराळा तालुक्यात काही ठिकाणी हिंसक वळण लागले होते. त्यामुळे आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सांगली जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांचा समावेश होता. तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणी तपास करत न्यायालयात आरोप पत्र दाखल केले होते.
दरम्यान, या प्रकरणी राज ठाकरे यांच्याविरोधात दोन अजामीनपात्र वॉरंटही बजावण्यात आले होते. पण, राज यांच्या वकिलाने ते वॉरंट रद्द करुन घेतले होते. इस्लामपूर जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यात न्यायाधीशांनी ठाकरे यांना दोषमुक्त केले असल्याची माहिती समोर येत आहे.




